देशभरामध्ये करोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये अनेक ठिकाणी आरोग्य सुविधांचा तुटवडा जाणवू लागला आहे. अनेक ठिकाणी रुग्णांना बेड उपलब्ध होत नाहीय. देशातील वेगवेगळ्या भागांमध्ये करोना सेंटर्सची उभारणी करण्यात आली असली तरी तेथील बेड्सही पुर्णपणे भरलेले असल्याने करोनाबाधित नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. मात्र जे रुग्ण दाखल झाले आहेत त्यांनाही वेगळवेगळ्या समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. असाच एक व्हिडीओ काही दिवसांपासून सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक करोना रुग्ण ‘करोनाची भीती नाही वाटत, पंख्याची वाटतेय,’ असं सांगत रुग्णालयातील पंख्याची तक्रार करत पंखा दाखवताना दिसतोय.

व्हायरल व्हिडीओत काय?

व्हायरल झालेल्या व्हिडीओत एक रुग्ण तोंडाला मास्क लावून बेडवर आडवा पडलेला दिसत आहे. व्हिडीओ सुरु झाल्यानंतर तो, ”कोरोना से नही सहाब पंखे से डर लगता है” म्हणत वर फिरणारा पंखा दाखवतो. व्हिडीओत दिसणारा पंखा हा फॉल सिलिंगमध्ये वर्तुळाकार होल पाडून त्यामधून पंखा जोडण्यात आला आहे. मात्र सिलिंगला लटकणारा हा पंखा अगदी सिलिंगला जोडलेल्या दांड्यापासून फिरतोय. त्यामुळेच हा पंखा पडेल की काय अशी भीती या रुग्णाला असल्याचे तो व्हिडीओत सांगतो. यासंदर्भात मी डॉक्टरांकडे आणि रुग्णालय कर्मचाऱ्यांकडे अनेकदा तक्रार केलीय. पण हा पंखा नीट करण्यात आलेला नाही असं हा रुग्ण सांगतोय. त्याचप्रमाणे या पंख्यामुळे मला रात्रभर झोप येत नसल्याचंही तो सांगताना दिसत आहे.

हा व्हिडीओ नक्की कुठला आहे, हा रुग्ण कोण आहे यासंदर्भातील कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र हा व्हिडीओ व्हायरल झाला असून गंभीर परिस्थितीमध्येही रुग्णांना व्यवस्थापनाच्या ढिसाळ कारभारामुळे नको त्या समस्यांचा सामना करावा लागत असल्याचे या व्हिडीओच्या माध्यमातून दिसत आहे.