गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर उकळत्या पाण्यात ध्यान करतानाचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय. एका भल्या मोठ्या कढईमधलं उकळतं पाणी, कढईखाली धगधगती आग आणि त्यात ध्यान करत असलेल्या या मुलाचा व्हिडीओ पाहून हा चमत्कार आहे की काय, अशी प्रतिक्रिया काही जणांनी व्यक्त केलीय. या व्हिडीओवर पोलखोल करणाऱ्या पोस्ट आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर फसवेगिरीचा दावा केलाय.

युकेमधल्या एका युजरने हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. ‘२०२१ मधलं भारत’ असं लिहित त्यांनी हा थरारक व्हिडीओ शेअर केलाय. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होऊ लागला.

हा व्हिडीओ जर बारकाईने पाहिला तर लक्षात येईल की उकळत्या पाण्याप्रमाणे बुडबुडे दिसत असले तरी ते केवळ एकाच भागात आहेत. मुलाच्या चहुबाजूने टाकलेली फुले उकळताना दिसत नाहीत. पाण्याला उकळी आलीय म्हणजेच पाण्याचे तापमान १०० डिग्री सेल्सियसच्या वर असायला हवे. मग असे असेल तर त्यातून वाफ कशी निघत नाही? एवढे प्रचंड उकळलेले पाणी असूनही फुले आहे अशीच ताजीतवानी कशी दिसतायेत? उकळत्या पाण्यात टाकलेली फुले काही वेळातच कोमेजून जातात, त्यांचा लगदा होतो.

त्यामूळे या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी दोन स्वतंत्र कढईच्या माध्यमातून ही फसवेगिरी केल्याचा दावा केलाय. या फसवेगिरीचा भांडाफोड केल्याच्या अनेक पोस्ट नेटकरी सोशल मीडियावर शेअर करत आहेत. अनेकांनी हा प्रयोग कुठं करण्यात आलाय, याची माहिती विचारली आहे. काहींचा अशा प्रकारावर विश्वास असल्याचं दिसत आहे.

हा व्हिडीओ खूप जूना असल्याचं सांगण्यात येतंय. वर्षभरापूर्वीच युट्यूबवर अनेकांनी हा व्हिडीओ अपलोड केला होता. लहान मुलाची शारीरिक छळवणूक चालू असल्याचे गृहीत धरून युट्युबने हा व्हिडीओ काढून टाकला होता. या व्हिडीओमध्ये बोर्डवर ‘भक्त प्रहलाद’ असं लिहिलंय. या एकंदर दृश्याकडे लोक दैवी चमत्काराच्या दृष्टीने पाहत आहेत.