भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा या दोघांनी करोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका बसलेल्यांना मोठ्याप्रमाणात आर्थिक मदत केली आहे. दोघांनी करोना संकटाच्या काळामध्ये गरजूंना मदत करण्यासाठी कोव्हिड १९ फंड गोळा केला. या फंडामध्ये गोळा झालेल्या पैशांमधून गरजूंची मदत केली जात आहे. समोर आलेल्या माहितीनुसार विराट अनुष्काने घेतलेल्या या पुढाकारामुळे अयांश गुप्ता नावाच्या छोट्या मुलाचाही जीव वाचलाय. अयांशला स्पायनल मस्क्युलर एट्रोफी नावाचा दुर्मिळ झालाय. यासाठी अयांशचे पालक जगातील सर्वात महागडं औषध म्हणजेच जोल्गेनस्मा मिळवण्याचा प्रयत्न करत होते. या औषधाची किंमत १६ कोटी रुपये इतकी आहे.

अयांशच्या उपचारांसाठी पैसे गोळा करण्याच्या उद्देशाने त्याच्या आई वडिलांनी अयांश फाइट्स एसएमए नावाचं ट्विटर हॅण्डल सुरु केलं. काही दिवसांपूर्वीच या अकाऊंटवरुन अयांशला ज्या जोल्गेनस्मा औषधाची गरज होती, ते मिळाल्याचं म्हटलं आहे. यासाठी अयांशच्या पलकांनी विराट आणि अनुष्काचे आभार मानलेत. अयांशच्या पालकांनी अयांशसोबतचा फोटो पोस्ट करत आपण करुन दाखवलं असून म्हणत १६ कोटी जमा करण्यात यश आल्याचं म्हटलं आहे. हा अवघड प्रवास अशा सुंदर पद्धतीने संपेल असा आम्ही विचार केला नव्हता. अयांशच्या उपचारासाठी लागणारे १६ कोटी जमा झाले आहेत. आमची साथ देणाऱ्या प्रत्येकाचे आभार, असं या दोघांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

विराट आणि अनुष्काचाही फोटो ट्विट करत या दोघांनी केलेल्या मदतीसाठी अयांशच्या पालकांनी त्यांचे आभार मानलेत. “विराट आणि अनुष्का चहाते म्हणून आमचं तुमच्यावर खूप प्रेम आहे. मात्र अयांशसाठी आणि या मोहीमेसाठी तुम्ही जे केलं आहे ते आमच्या अपेक्षेहूनही अधिक आहे. तुम्ही दाखवलेल्या औदार्याबद्दल आम्ही तुमचे आभार मानतो. आयुष्याचा हा सामना जिंकण्यासाठी तुम्ही षटकार खेचत आम्हाला विजय मिळून दिलाय. आम्ही या मदतीसाठी तुमचे सदैव ऋणी राहू,” असं अयांशच्या पालकांनी म्हटलं आहे.


या पोस्टवर विराट आणि अनुष्काच्या अनेक चाहत्यांकी कमेंट करुन त्यांचं अभिनंदन केलं आहे. अयांशला मदत केल्याबद्दल विराट आणि अनुष्काचं कौतुक करावं तेवढं थोडं असल्याचं अनेकांनी म्हटलं आहे.