लोकप्रियतेची गोष्ट आली की भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प या दोघांमध्ये कायम स्पर्धा असल्याची दिसते. एखाद्या अहवालात मोदी सर्वाधिक लोकप्रिय ठरतात, तर कधी ट्रम्प मोदींना लोकप्रियतेच्या बाबतीत धोबीपछाड देतात. मात्र सध्या लोकप्रियतेच्या बाबतीत सर्वत्र भारताच्या क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीची चर्चा रंगली आहे.

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली हा आपल्या उत्कृष्ट खेळीने चाहत्यांची मने जिंकतो. त्याचसोबत त्याच्या स्टाईलमुळे अनेक तरूण-तरूणींचा तो ‘स्टाईल-आयकॉन’देखील आहे. त्याच्या चाहत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सोशल मीडियावर देखील त्याच्या फॉलोअर्सची संख्या मोठी आहे. तशातच विराटने इन्स्टाग्रामवर एक धमाका केला आहे. संपूर्ण भारतात ५ कोटी (५ मिलियन) फॉलोअर्स असणारा विराट हा एकमेव व्यक्ती ठरला आहे.

विराटने लोकप्रियतेच्या बाबतीत बॉलीवूडचे सेलिब्रीटीच नव्हे, तर पंतप्रधान मोदी यांनाही मागे टाकले. पंतप्रधान मोदी यांचे इन्स्टाग्रामवर ३४ मिलियनच्या घरात फॉलोअर्स आहेत. पण विराटने मात्र ५० मिलियन फॉलोअर्सचा टप्पा गाठला आहे. असा पराक्रम करणारा विराट हा एकमेव भारतीय आहे. इंन्स्टाग्रामवर आतापर्यंत ९३० पोस्ट अपडेट केल्या आहेत. त्या पोस्टच्या आधारावर त्याने आताच ५ कोटी फॉलोअर्स कमावले आहेत.

इन्स्टाग्रामवर असलेल्या अधिकृत अकाऊंटपैकी (व्हेरिफाईड) सेलिब्रिटींमध्ये पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्टियानो रोनाल्डो हा पहिल्या क्रमांकावर आहे. त्याचे २० कोटी (२०० मिलियन) फॉलोअर्स आहेत. भारतीय सेलिब्रिटींचा विचार केल्यास बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा दुसऱ्या स्थानी आहे. तिचे ४९ मिलियन फॉलोअर्स आहेत, तर दीपिका पदुकोण ही तिसऱ्या क्रमांकावर आहे. तिचे ४४ मिलियन फॉलोअर्स आहेत.