भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने सोशल मीडियावर चाहत्यांसमवेत प्रश्नोत्तराचे सत्र केले होते. यात एका चाहत्याने त्याला त्याच्या डाएट सवयीबद्दल विचारले असता कोहली म्हणाला, की त्याच्या आहारात भाज्या अंडी, २ कप कॉफी, मसूर, क्विनोआ, पालक, डोसा असतो. पण हे सर्व तो मर्यादित प्रमाणात खातो. या उत्तरामुळे अनेकांनी विराटची खिल्ली उडवली. अनेकांनी त्याला अंडी खाणारा शाकाहारी माणूस, असेही म्हटले. आता विराटनेच यावर स्पष्टीकरण दिले असून एक ट्वीटही केले आहे.

विराटने शाकाहारी असल्याचे स्पष्ट केले आहे. ”मी कधीही वीगन (vegan)असल्याचा दावा केलेला नाही, मी नेहमीच असे म्हटले आहे, की मी शाकाहारी आहे, दीर्घ श्वास घ्या आणि शाकाहारी खा (तुम्हाला हवे असल्यास)”, असे विराटने आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे. विराटच्या या ट्वीटवर चाहते प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. जे लोक आहारात मांस व दुग्धजन्य पदार्थ वापरत नाहीत, त्यांना वीगन (vegan) म्हणतात.

हेही वाचा – अभिनंदन..! पंजाब किंग्जचा स्फोटक फलंदाज निकोलस पूरननं केलं लग्न

 

हेही वाचा – टीम इंडियाच्या प्रमुख गोलंदाजाला जाणवली करोनाची लक्षणे, आईलाही केलंय रुग्णालयात दाखल

२०१९मध्ये विराटबद्दल एक माहितीपट बनवला गेला होता, ज्यात तो म्हणाला होता, की शाकाहारी झाल्यापासून तो आपल्या आयुष्यात खूप आनंदी आहे. २०१८मध्ये एका मुलाखतीदरम्यान विराटने नॉन-वेज सोडल्याचे सांगितले होते.

भारतीय क्रिकेट संघ उद्या २ जून रोजी इंग्लंडला रवाना होणार आहे. इंग्लंडमध्ये पोहोचल्यानंतर भारतीय संघातील खेळाडूंना कठोर क्वारंटाइन कालावधीत रहावे लागेल. हा कालावधी पूर्ण झाल्यानंतर भारतीय खेळाडू हॉटेलच्या खोलीतून बाहेर पडून सराव सत्रात सहभागी होऊ शकतात. भारतीय संघाला न्यूझीलंड विरुद्ध १८ जूनपासून होणाऱ्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळायचा आहे. यानंतर ऑगस्टमध्ये भारताचा संघ इंग्लंडविरुद्ध ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे.