करोनामुळे सध्या क्रिकेटचे सामने बंद आहेत. जुलैच्या पहिल्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेट सुरू होण्याची शक्यता आहे, पण भारताचे मात्र ऑगस्ट महिन्यापर्यंतचे सर्व दौरे रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे सारेच खेळाडू घरात बसून कंटाळले आहेत. काही खेळाडू कंटाळा घालवण्यासाठी लाइव्ह चॅटचा आधार घेत आहेत, तर काही खेळाडू जुन्या आठवणींमध्ये रमताना दिसत आहेत. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली यानेही अशीच एक गोष्ट चाहत्यांशी शेअर केली आहे.

विराट सध्या पत्नी अनुष्का शर्मा हिच्यासोबत घरात आहे. ते दोघेही झकासपैकी एकत्र वेळ घालवत आहेत. लॉकडाउन सुरू झाल्यापासून विराट-अनुष्काने अनेक फोटो शेअर केले आहेत. काही दिवसांपूर्वी तर हे दोघे आपल्या इमारतीच्या आवारात क्रिकेट खेळतानाही दिसले होते. पण अनुष्काची सोबत असतानाही विराट मात्र एक गोष्ट मिस करतोय. त्याने स्वत: फोटो पोस्ट करत याबद्दल सांगितलं आहे. विराटने एक छान निसर्गरम्य ठिकाणाचा फोटो पोस्ट केला आहे. त्यात तो आणि अनुष्का एका तलावाच्या काठावर निवांत बसले आहेत आणि गप्पा मारत आहेत. फोटोत केवळ ते दोघेच आहेत. या फोटो पोस्ट करत, ‘मी विविध ठिकाणी फिरणं, भ्रमण करणं मिस करतोय’, अशा आशयाचे कॅप्शन विराटने दिले आहे.

काही दिवसांपूर्वी रोहितनेही लॉकडाउन काळात एक गोष्ट मिस करत असल्याचे सांगितले होते. रोहित शर्माही आपली मुलगी समायरासोबत खेळतानाचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतो. रोहितने नुकताच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर समायरासोबत खेळताना एक छोटासा व्हिडीओ पोस्ट केला होता. पण तरीही तो एक गोष्ट मिस करत होता. रोहितने आणखी एक व्हिडीओ पोस्ट केला होता. या व्हिडीओमध्ये रोहित मैदानावर गोलंदाजांची धुलाई करत असून उत्तुंग असे षटकार लगावत होता. त्या व्हिडीओखाली रोहितने लिहिले होते की मी ‘ही’ गोष्ट मिस करतो आहे.