लहान मुलांबद्दलचे विराटचे प्रेम काही लपून राहिले नाही. एरव्ही क्रिकेटच्या मैदानात आपल्या दमदार खेळीने प्रतिस्पर्ध्यांच्या नाकी नऊ आणणारा आक्रमक आणि वेळप्रसंगी रागीट वाटणारा विराट प्रत्यक्षात मात्र फारच वेगळा आहे. मैदानात आक्रमक असणारा विराट लहानमुलांच्या सोबत मात्र स्वत:ही लहान होतो. काल रंगलेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पराभव झाला. पण या पराभवातून थोडसं स्वत:ला सावरत आपला वेळ विराटने हरभजन सिंगच्या चिमुकली सोबत घालवला आहे.
हरभजन सिंग आणि गीता बसराची मुलगी हिनायासोबतचा सेल्फी विराटने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ‘छोटी हिनाया माझ्या दाढीत काहीतरी शोधतेयं असं दिसतंय! कोणी इतकं गोंडस कसं असू शकतं? गीता आणि हरभजन खूप नशिबवान आहेत’ असे म्हणत हा सेल्फी विराटने शेअर केला आहे. लहान मुलांसोबत वेळ घालवण्याची विराटची ही काही पहिलीच वेळ नाही. टी२० सामन्याच्यावेळी विराटने धोनीची मुलगी झिवासोबतचा आपला सेल्फी शेअर केला होता. ‘झिवा मोबाईल हाताळण्याचे धडे घेत आहे’ असे लिहित विराटने तो फोटो त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला होता.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 2, 2017 2:07 pm