भारतीय संस्कृतीत शेजारधर्माला खूप महत्व आहे. खडतर काळात ज्यावेळी आपण आपल्या घरापासून दूर असतो त्यावेळी शेजारीच आपला पहिला परिवार असतो. अनेक अडचणीच्या प्रसंगी शेजारी मदतीसाठी धावून येतात. सध्या करोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा फटका जगभराला बसला आहे. क्रीडा क्षेत्रही यातून सुटलेलं नाही. भारतीय संघाचे सर्व खेळाडू या काळात घरात राहून आपल्या परिवारासोबत वेळ घालवत आहेत. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीही आपल्या मुंबईतल्या घरी पत्नी अनुष्का शर्मासोबत राहतो आहे.

विराटच्या घरापासून काही मिनीटांच्या अंतरावर राहणाऱ्या श्रेयस अय्यरने लॉकडाउनमध्ये आपल्या कर्णधाराची एका चांगल्या शेजाऱ्यासारखी काळजी घेतली आहे. श्रेयसने खास आपल्या आईच्या हातचे नीर डोसे विराटसाठी आणले होते. विराटने या कृतीसाठी श्रेयसचं कौतुक करत, आईला थँक्यू म्हणायला सांगितलं आहे. श्रेयससोबतचा फोटो विराटने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे.

लॉकडाउन काळात ४ महिने बंद असलेलं आंतरराष्ट्रीय क्रिकेट सुरु झालेलं असलं तरीही भारतीय खेळाडूंना मैदानावर पाहण्यासाठी चाहत्यांना काहीकाळ वाट पहावी लागणार आहे. सध्या बीसीसीआय आयपीएलचा तेरावा हंगाम आयोजित करण्याच्या तयारीत आहे. आयपीएलमध्ये विराट RCB तर श्रेयस DC संघाचं नेतृत्व करतो.