पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त केला जात असून पाकिस्तानला चोख उत्तर दिलं जावं अशी मागणी केली जात आहे. भारताचा स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागने या हल्ल्याचा निषेध केला आहे. मुलतान का सुलतान अशी क्रिडा क्षेत्रात ओळख असणाऱ्या विरूने पाकिस्तानला चांगलेच खडसावले संताप व्यक्त केला आहे.

‘सुधर जाओ वरना सुधार देंगे’ अशा शब्दात सेहवागने पाकिस्तानवर चांगलाच संतापला आहे. पुलवामा हल्ल्याबद्दल वीरेंद्र सेहवागने दु:ख व्यक्त केले आहे. शोक व्यक्त करण्यासाठी शब्द नाहीत असे त्याने म्हटले आहे. सेहवागने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, जम्मू काश्मीरमध्ये सीआरपीएफच्या वीर जवानांवर झालेल्या भ्याड हल्लाने दु: ख झालं. दु:खाचे वर्णन करण्यासाठी शब्द नाहीत. जखमी जवान तातडीने बरे व्हावेत हीच मनोकामना.

सेहवाग व्यतिरिक्त सचिन आणि गौतम गंभीरनेही आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. फुटीरतावाद्यांशी चर्चा करता, पाकिस्तानशी चर्चा करतो, मात्र आता ही बातचीत टेबलवर नको, युध्दभूमीत व्हायला हवी. आता सहनशक्ती संपली आहे असा संताप गंभीरने व्यक्त केला आहे.

सचिन काय म्हणाला –
सचिन तेंडुलकरने ट्विटरवर भावनिक संदेश टाकत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ‘भ्याड, धूर्त आणि अर्थहीन…आपल्या प्रियजणांना ज्यांनी गमावलं आहे त्यांच्यासाठी जीव तुटतो..रुग्णालयात उपचार घेत आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करतो. तुमच्या सेवा आणि निष्ठेला माझा सलाम आहे’, असं सचिन तेंडुलकरने ट्विटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, तब्बल ३५० किलो स्फोटकांनी भरलेल्या ट्रकद्वारे जैश ए मोहम्मदच्या अतिरेक्याने गुरुवारी पुलवामा जिल्ह्य़ात चढविलेल्या भीषण आत्मघातकी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे ३९ जवान शहीद झाले असून २० जखमी झाले आहेत. गेल्या दोन दशकांतील हा सर्वात मोठा हल्ला आहे. या हल्ल्याने देशभर संतापाची लाट उसळली असून या जवानांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही, असा गर्भित इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. आदिल दार असे आत्मघातकी हल्ला चढविणाऱ्या अतिरेक्याचे नाव आहे. तो दक्षिण काश्मीरमधील काकेपुराचा आहे. २०१८मध्ये तो जैश ए महम्मदमध्ये सामील झाला होता. सुटी संपवून सेवेत रुजू होणाऱ्या २,५४७ जवानांना ७० वाहनांतून नेले जात होते. दर खेपेस हजार जवानांना नेले जाते, पण यावेळी ही संख्या दुपटीपेक्षा जास्त होती. पहाटे साडेतीन वाजता जम्मूहून हा ताफा निघाला आणि सूर्यास्ताआधी तो श्रीनगरला पोहोचणे अपेक्षित होते. श्रीनगर-जम्मू महामार्गावर अवंतीपुरा येथील लट्टूमोड येथे हा ताफा पोहोचला असताना हा हल्ला झाला. जवानांच्या ताफ्यावर गोळीबारही झाला आणि क्षणार्धात स्फोटक भरलेला ट्रक त्या ताफ्यात धडकल्याने भीषण स्फोट झाला. त्यात ७६व्या बटालियनच्या वाहनाच्या चिंधडय़ा उडाल्या. अन्य काही वाहनांचीही मोठी हानी झाली आहे. काही वाहनांवर गोळीबाराच्या खुणा आहेत. त्यामुळे परिसरात काही अतिरेकी लपून बसले असावेत आणि त्यांनी हा गोळीबार केला असावा, असा तर्क आहे. हल्ला झालेले ठिकाण श्रीनगरहून ३० कि.मी.वर आहे.