करोनामुळे एकीकडे संपूर्ण जग बंदिस्त झालं असताना अनेक ठिकाणी कुटुंबीयदेखील दुरावल्याचं चित्र आहे. अशीच एक ह्रदयद्रावक घटना समोर आली आहे ज्यामध्ये पती बेशुद्ध पडला असतानाही पत्नी मुलीला पाणी पाजू देत नव्हती. करोना पॉझिटिव्ह वडील जमिनीवर बेशुद्ध अवस्थेत पडलेले पाहून मुलीला मात्र राहावत नव्हतं. मुलगी वडिलांनी पाणी पाजण्यासाठी आईशी संघर्ष करता असतानाचा ह्रदयद्रावक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पित्याने अखेर मुलगी आणि पत्नीसमोरच जीव सोडला.

आंध्र प्रदेशात ही घटना घडली आहे. करोनाची लागण झालेले वडील जमिनीवर बेशुद्ध अवस्थेत पडले होते. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. वडिलांची ही परिस्थिती पाहून एकीकडे मुलगी आक्रोश करत असताना आई मात्र तिला त्यांच्याजवळ जाण्यापासून रोखत होती. अखेर मुलगी आपल्या वडिलांपर्यंत जाते आणि त्यांना पाणी पाजत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे.

आंध्रप्रदेशातील श्रीकाकुलम गावात ही घटना घडली आहे. मजूर म्हणून काम करणारा पीडित ५० वर्षीय व्यक्ती विजयवाडा येथून आपल्या गावी परतला होता. लॉकडाउनच्या भीतीने कुटुंबासोबत ते परतले होते. त्याला आणि कुटुंबाला करोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झाल्यानंतर गावकऱ्यांनी गावापासून दूर शेतात असणाऱ्या झोपडपट्टीत विलगीकरणात राहण्यास सांगितलं होतं. पण यावेळी त्याची प्रकृती बिघडली आणि पत्नी व मुलीसमोरच त्याने जीव सोडला.

विशेष म्हणजे व्हिडीओत गावकऱ्यांचा आवाजही ऐकू येत आहे. यावेळी व्हिडीओ शूट केला, मात्र मदतीसाठी मात्र कोणीही पुढे आलं नाही.