करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सध्या देशभरातील सर्व क्रीडा स्पर्धा बंद आहेत. २९ मार्चपासून सुरु होणारी आयपीएल स्पर्धाही १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आलेली आहे. मात्र देशातली सध्याची परिस्थिती पाहता, १५ एप्रिलपासून आयपीएल सुरु होईल याची शाश्वती नाही. त्यामुळे भारतीय खेळाडू या काळात सध्या घरातच राहत आपल्या परिवारासोबत वेळ घालवत आहेत. अनेक खेळाडू या दिवसांमध्ये सोशल मीडियावर विविध प्रयोग करतानाही पहायाल मिळत आहेत. मात्र गेले काही दिवस भारतीय संघापासून दूर असलेला महेंद्रसिंह धोनी आज सोशल मीडियावर आला आहे.

महेंद्रसिंह धोनीची हेअर ड्रेसर सपना भवनानीने, झिवाचा धोनीला मेकअप करताना एक जुना व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे. झिवा या व्हिडीओत धोनीचा मेकअप करताना दिसत आहे, महत्वाची गोष्ट म्हणजे धोनीही आपल्या मुलीसमोर शांत बसून तिच्या प्रयत्नांना दाद देताना पहायला मिळत आहे. इतक्या लवकर मला माझी नोकरी सोडावी लागेल असं वाटलं नव्हतं…अशी कॅप्शन देत सपनाने मित्रा तुझी खूप आठवण येतेय असाही संदेश दिला आहे.

दरम्यान, धोनीसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५ एप्रिल हा दिवस अतिशय महत्वाचा आहे. आजच्या दिवशी २००५ साली धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपलं पहिलं शतक झळकावलं होतं. विशाखापट्टणमच्या मैदानावर खेळत असताना धोनीने पाकिस्तानविरुद्ध वन-डे सामन्यात पहिल्या शतकाची नोंद केली होती. धोनीने १२३ चेंडूत १५ चौकार आणि ४ षटकारांच्या सहाय्याने १४८ धावांची खेळी केली. या सामन्यात धोनीला विरेंद्र सेहवाग आणि राहुल द्रविड यांनी मोलाची साथ दिली. पाकिस्तानी गोलंदाजांचा समाचार घेताना भारताने या सामन्यात ९ गड्यांच्या मोबदल्यात ३५६ धावांचा डोंगर उभा केला.