भारताची आघाडीची धावपटू हिमा दासने परदेशात अवघ्या १९ दिवसांच्या कालावधीत ५ सुवर्णपदकांची कमाई करत आपली चमक दाखवली. आगामी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत अशीच कामगिरी करत ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्याचं हिमा दासचं स्वप्न आहे. आपल्या घरापासून हजारो किलोमीटर लांब परदेशात असलेल्या हिमाला घरच्या खाण्याची आठवण झाली आणि तिने आपल्या हॉटेलच्या रुमवरच आसामी पद्धतीने आमटी बनवण्याचा व्हिडीओ शेअर केला आहे.

रविवारपासून हिमा दासने आपल्या सरावामधून विश्रांती घेतली आहे. त्यामुळे मधल्या काळात हॉटेलवर असताना भूक लागल्यामुळे हिमाने लगेचच आसामी पद्धतीने आमटी बनवली. हिमाच्या या पाककौशल्याचं हॉटेलमध्ये उपस्थित असलेल्या तिच्या सहकाऱ्यांनीही कौतुक केलं आहे.

हिमा दासच्या इतर सहकाऱ्यांनी खास स्थानिक बाजारामध्ये जाऊन, हिमाच्या स्वयंपाकासाठी लागणारं सर्व साहित्य आणलं. हिमाच्या या पाककौशल्याचं सोशल मीडियावरही कौतुक होताना दिसत आहे.