हाँगकाँगमधील गुन्हेगारांना चीनच्या ताब्यात देण्याबाबतचे वादग्रस्त प्रत्यार्पण विधेयकावरुन वातावरण चांगलेच तापले आहे. या विधेयकाविरोधात हाँगकाँगमधील नागरिकांनी जोरदार निदर्शने केली असून, तसेच तेथील पार्लमेंटवर चाल करून जाण्याचा प्रयत्न केला होता. जवळजवळ २० लाख नागरिक या निदर्शनांमध्ये सहभागी झाले होते. इतक्या मोठ्या संख्येने नागरिक रस्त्यांवर उतरले असतानाच एक रुग्णवाहिका गर्दीमध्ये अडकून पडल्याचे निदर्शकांच्या लक्षात आले आणि नागरिक त्या रुग्णवाहिकेला जाण्यासाठी रस्ता मोकळा करुन देऊ लागले. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होताना दिसत आहे.

हा व्हिडिओ ट्विटवर पोस्ट करणारा स्थानिक म्हणतो, ‘मोठ्या संख्येने उपस्थित असलेले नागरिक रुग्णवाहिका आल्यानंतर बाजूला होत तिला जाण्यासाठी जागा करुन देत होते. हाँगकाँगमधील गुन्हेगार नाहीत.’

हा व्हिडिओ मानवी हक्कांसाठी काम करणाऱ्या ह्युमन राईट्स वॉच या संस्थेचे अध्यक्ष केनेथ रोथ यांनाही ट्विटवरुन शेअर केला असून त्यांनी कॅप्शनमधून यालाही विकृती म्हणाल का असा अशायाचा सवाल विचारत नक्कीच नाही असंही म्हटलं आहे.

अशाच प्रकारचा एक केरळमधील पल्लकड येथील व्हिडिओ याच वर्षी मार्च महिन्यामध्ये व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्येही रस्त्यावर आंदोलन करणाऱ्यांना रुण्गवाहिकेला जाण्यासाठी जागा करुन दिल्याचे दिसत होते.

दरम्यान हाँगकाँगमधील चीन नियंत्रित सरकारने वादग्रस्त प्रत्यार्पण विधेयक मागे घेत एक पाऊल माघारी घेतले आहे. विधेयक स्थगितीला चीननेही हिरवा कंदिल दिला आहे. हाँगकाँगच्या चीन समर्थक नेत्या कॅरी लाम यांच्यावर हे विधेयक रद्द करण्यासाठी त्यांच्याच पक्षातील सहकारी व सल्लागारांकडून दबाव आला होता. १९९७ मध्ये हाँगकाँगचे हस्तांतरण चीनकडे करण्यात आल्यानंतरच्या काळातील सर्वात मोठी निदर्शने बुधवारी झाली होती. त्याआधी गेल्या रविवारी दहा लाख लोकांचा सहभाग असलेला मोर्चाही निघाला होता.