जगभरामध्ये करोनाने थैमान घातलं आहे. करोनामुळे मरण पावलेल्यांची संख्या सहा लाखांहून अधिक झाली असून अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रीकेमध्ये करोना बाधितांची संख्या वाढत आहे. जगभरात करोनाचे पहिले १० लाख रुग्ण होण्यास तीन महिन्याचा कालावधी लागला होता. मात्र मागील १०० तासांमध्ये जगभरात करोनाने १० लाख नवे रुग्ण आढळून आल्याने करोनाचा संदर्भातील चिंता आणखीनच वाढली आहे. एकीकडे करोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच दुसरीकडे लॉकडाउनचे नियम हळहळू शिथिल करत अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी अनेक देशांनी महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. त्यामुळेच अनेकजण हळहळू कामावर रुजू होताना दिसत आहेत. मात्र मास्क, सोशल डिस्टन्सिंग यासारख्या नियमांची बंधन घालून देण्यात आली आहेत. मास्क तर आता कपडे किंवा चप्पलांप्रमाणेच झाले असून मास्कशिवाय घराबाहेर पडणार नाही अशी भूमिका अनेकांनी घेतल्याचे दिसून येत आहे. अनेकजण तर ऑफिसमध्येही दिवसभर मास्क घालून असतात. त्यातही सोशल नेटवर्किंगवर चष्मा वापरणाऱ्यांना मास्कचा वेगळीच अडचण असल्याची तक्रार केली जात आहे. यावरच एका चष्म्याच्या ब्रॅण्ड अकाउंटवरुन काही झकास उपाय सुचवण्यात आले आहेत.

चष्मा असणाऱ्यांनी मास्क घातल्यानंतर त्यांच्या चष्म्याच्या काचेवर बाष्प जमा होते अशी तक्रार करताना दिसत आहेत. यावरच मिलर अ‍ॅण्ड मेक्युरे (Miller and McClure) ऑप्टीशियन या ब्रॅण्डमध्ये काम करणाऱ्या एका व्यक्तीने व्हिडिओच्या माध्यमातून काही सोप्या ट्रीक्स सांगितल्या आहेत. या ट्रीक्स वापरल्यास चष्मा असणाऱ्यांनी मास्क घातल्यावरही त्यांच्या चष्म्याच्या काचेवर बाष्प जमा होणार नाही. मिलर अ‍ॅण्ड मेक्युरेच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन “मास्क घालणे बंधनकारक केल्यामुळे या आहेत चष्मा घालणाऱ्यांसाठी काही खास टीप्स”, अशा कॅप्शनसहीत व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

आधी या व्हिडिओमध्ये चष्मा घालणाऱ्यांना मास्कमुळे नक्की काय अडचण होते हे दाखवण्यात आलं आहे. चष्म्यावर बाष्प साठू नये म्हणून “मास्क हे चष्म्याच्या आतमधून घाला. म्हणजेच चेहऱ्यावर आधी मास्क लावा आणि मग चष्मा घाला,” असं व्हिडिओमधील व्यक्ती सांगताना दिसते. त्याचप्रमाणे टीश्यू पेपर वापरुन आणि मास्कला घालताना एक छोटी गाठ मारल्यानेही बाष्प जमा होण्याची अडचण कशी सोडवता येईल हे या व्हिडिओमधील व्यक्ती सांगताना दिसते.

तुम्हाला या टीप्स फायद्याच्या ठरतात का एकदा ट्राय करुन पाहा. आणि कमेंटमध्ये तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा