भारताने जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रद्द केल्यानंतर पाकिस्तानचा तिळपापड झाला आहे. भारतावर दबाव आणण्यासाठी पाकिस्तान सर्व स्तरांमधून दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांच्या सरकारमधील मंत्र्यांनी मागील महिन्याभरामध्ये या निर्णयावरुन भारतावर टीका केली. मात्र आता पाकिस्तानमधील एका १५ वर्षांच्या मुलाने इम्रान खान यांना काश्मीरऐवजी पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेकडे लक्ष द्या असा सल्ला दिला आहे. या मुलाचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.

भारताने कलम ३७० रद्द केल्यानंतर पाकिस्तानाने तडकाफडकी भारताबरोबरचे सर्व व्यापारी संबंध तोडून टाकले. याचा पाकिस्तानला मोठा फटका बसला आहे. टोमॅटो आणि कांद्यासारख्या रोजच्या वापरातील वस्तूंचे भावही भरमसाठ वाढले आहेत. आधीच पाकिस्तानची अर्थव्यवस्था नाजूक स्थितीत असताना या निर्णयामुळे सामान्यांच्या खिशाला झळ पोहचताना दिसत आहेत. यावरुनच एका मुलाने पाकिस्तानच्या धोरणांवर टिका केली आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना या मुलाने पाकिस्तानमधील सरकारला आणि सरकारी अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले आहेत. जगभरातील देशांनी तुमचे म्हणणे ऐकावे असं वाटतं असेल तर आधी देशाची आर्थिक घडी योग्य पद्धतीने बसवण्याची गरज आहे असा टोला या मुलाने लगावला आहे. ‘पाकिस्तानमधील आर्थिक परिस्थितीचे गांभीर्य इम्रान खान यांच्यापेक्षा या मुलाला अधिक आहे असं वाटतं,’ या कॅप्शनसहीत हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

व्हायरल व्हिडिओमधील मुलाचे नाव समजू शकले नसले तरी त्याने मांडलेले मुद्दे अनेकांना पटल्याचे कमेंटमधून दिसून येत आहे. ‘भारताचे जगभरातील देशांबरोबर चांगले व्यापारी संबंध असल्याने अनेक देश पाकिस्ताऐवजी भारताला समर्थन देताना दिसत आहेत. जोपर्यंत आपण आपली अर्थव्यवस्था भारताच्या बरोबरीला आणत नाही तोपर्यंत आपल्या मुद्द्यांना महत्व दिले जाणार नाही,’ असं हा मुलगा या व्हिडिओमध्ये सांगताना दिसत आहे. इतकचं नाही तर त्याने जगातील कोणत्याही देशाला भारताला नाराज करणे परवडणारे नसल्याचे मत मांडले आहे. ‘पाकिस्तानची बाजू घेऊन भारताला नाराज करणे जगातील कोणत्याही देशाला परवडणारे नाही,’ असं या मुलाने म्हटलं आहे.

पाकिस्तानमधील आर्थिक परिस्थिती सुधारली तर पाकिस्तानची काश्मीरबद्दलची बाजू जागतिक स्तरावर अधिक भक्कमपणे मांडता येईल, असं या मुलाने म्हटलं आहे. काश्मीरच नाही तर बलुचिस्तान आणि इतर दूर्गम भागातील अनेक विषयांवर उत्तर शोधायचे असल्यास पाकिस्तानला आपल्या अर्थव्यवस्थेकडे लक्ष द्यायला हवे असे मत या मुलाने व्यक्त केले आहे. ‘काश्मीर विषयावर पाकिस्तानने हस्तक्षेप केल्यास त्याचा सर्वाधिक त्रास तेथील जनतेलाच होतो. त्यामुळे पाकिस्तानने आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम होऊन आपले मुद्दे मांडल्यास त्या मुद्द्यांना अधिक जास्त गांभीर्याने घेतले जाईल. त्यावर चर्चा होण्याची शक्यता वाढेल,’ असा विश्वास या मुलाने व्यक्त केला आहे.

या व्हिडिओच्या ट्विटखाली अनेकांनी या मुलाच्या मताशी आपण सहमत असल्याचे मत व्यक्त केले आहे. तर काहींनी या मुलाने मांडलेले मत हे आधी सराव करुन मांडल्याची टीका केली आहे.