करोनामुळे संपूर्ण देशामध्ये लॉकडाउन सुरु आहे. २५ मार्च रोजी सुरु झालेल्या लॉकडाउनचा चौथा टप्पा १७ मे रोजी संपणार आहे. मात्र हे लॉकडाउन वाढण्याची चिन्हे दिसत असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. लॉकडाउनच्या कालावधीमध्ये सार्वजनिक वाहतूक, प्रवासावरील निर्बंध, हॉटेल तसेच पर्यटनावर प्रतिबंध घालण्यात आले आहेत. त्यामुळेच अनेक ठिकाणी वन्य प्राणी दिसून आल्याच्या घटना समोर आल्या आहेत. यामध्य़े अगदी थंड हवेच्या ठिकाणी पर्यटक कमी झाल्याने भर वस्तीत रस्त्यावर दिसणारे वन्य प्राण्यांपासून मुंबईसारख्या शहरांमध्ये राजभवन परिसरात रस्त्यावर मोरांचे दर्शनापर्यंत अनेक बातम्या समोर आल्या आहेत. मात्र हैदराबादमधील एका व्यस्त महामार्गाच्या मध्यभागी एक बिबट्या आराम करताना अढळून आल्याने अनेकांची भंभेरी उडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी हैदारबादमधील दोन ठिकाणी बिबट्याचे दर्शन झाले. गोळकोंडा किल्ल्याच्या फतेह दरवाजा परिसर आणि राजेंद्रनगर परिसरातील कटेदान बायपासजवळ बिबट्याचे दर्शन झाल्याने स्थानिकांमध्ये घबराट निर्माण झाली. मायलेरदेवपल्ली आणि कटेदान या राष्ट्रीय महामार्ग सातवर तर बिबट्या रस्त्याच्या मध्यभागी डिव्हाडरजवळ बसल्याचे दिसून आले. अनेकजण आपल्या गाड्या थांबवून बिबट्याचे फोटो आणि व्हिडिओ मोबाइल कॅमेरामध्ये कैद करत होते. “सकाळी सव्वा आठच्या सुमारास स्थानिकांना राष्ट्रीय महामार्ग सातवर बिबट्या दिसल्याची माहिती आम्हाला दिली. पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहचेपर्यंत बिबट्या जवळच्या मोकळ्या परिसरामध्ये पळून गेला. स्थानिक पोलीस आणि वनअधिकारी या बिबट्याचा शोध घेत आहेत,” अशी माहिती शमशाबादचे पोलीस आयुक्त प्रकाश रेड्डी यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.

शमशाबादचे जंगल परिसरामधून भटकत भटकत हा बिबट्या महामार्गावर आला असण्याची शक्यता वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. हा बिबट्या जखमी झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती. मात्र व्हिडिओ आणि एकदंरित फोटो पाहाता बिबट्याला गंभीर दुखापत झाल्याची शक्यता वन अधिकाऱ्यांनी फेटाळून लावली आहे. कालपासूनच सोशल नेटवर्किंगवर हा बिबट्या वेगवेगळ्या शहरांमध्ये दिसल्याचे सांगत व्हिडिओ व्हायरल केला जात आहे. अगदी महाराष्ट्रातील काही शहरांमध्येही अशाप्रकारे मेसेज व्हायरल केले जात आहेत. मात्र हा व्हिडिओ हैदराबादमधील असल्याने अफवांवर विश्वास ठेऊ नये.