करोना व्हायरसमुळे लॉकडाउन असल्याने देशभरातील एटीएममध्येही शुकशुकाट आहे. याचाच फायदा उचलत चक्क एका माकडाने एटीमएममध्ये प्रवेश करुन चांगलाच हैदोस घातलाय. दिल्लीच्या साउथ अ‍ॅव्हेन्यू परिसरातील ही घटना आहे.

काल(दि.६) सकाळी एक व्यक्ती साउथ अ‍ॅव्हेन्यू परिसरातील एसबीआयच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेला असता एटीएमच्या बाहेरील भाग तुटल्याचं त्याने पाहिलं. पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसही तातडीने पोहोचले. पण, सीसीटीव्ही पाहिल्यानंतर पोलिस चांगलेच हैराण झाले. कारण, एटीएममध्ये हैदोस घालणारा कोणी माणूस नव्हता तर तो एक माकड होता. या माकडाने मशिनचीही तोडफोड केल्याचं एटीएममधील सीसीटीव्हीमधून समोर आलंय. दिल्ली पोलिसांनी शेअर केलेला हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. त्यावर नेटकरीही मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत. काहींनी, ‘या माकडालाही दारु खरेदीसाठी रांगेत उभं रहायचंय, त्यासाठी पैशांची व्यवस्था करायला आलाय’, असं म्हटलं आहे. तर, काही नेटकऱ्यांनी ‘जर सीसीटीव्ही नसते तर काय झालं असतं? एखाद्या व्यक्तीवर विनाकाराण आरोप लावण्यात आला असता. बरं झालं सीसीटीव्ही आहेत’, असंही म्हटलंय. याशिवाय , ‘हा माकड गेल्या जन्मात नक्कीच एटीएम चोर असावा’ अशा प्रतिक्रियाही काही नेटकरी देत आहेत.
पाहा व्हिडिओ –


सोशल मीडियावर हा व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय आहे.