‘सोनू, तुला माझ्यावर भरवसा नाही का’ या मराठमोळ्या गाण्याने संपूर्ण देशाला अक्षरशः वेड लावलं. या गाण्याचे हिंदीसह विविध भाषांमधील व्हर्जन निघाले. या गाण्याने आता चक्क पाकिस्तानमध्येही छाप पाडली आहे. नवाझ शरीफ पंतप्रधानपदासाठी अपात्र ठरल्याच्या पार्श्वभूमीवर पाकमधील एका ग्रुपने ‘सोनू’वर आधारित भन्नाट व्हिडिओ फेसबुकवर अपलोड केला आहे.

यूट्यूबवर ‘सोनू तुला माझ्यावर भरोसा नाय का..’ हे गाणे सुपरहिट ठरले असून जो तो या गाण्यावर आधारित आपापलं व्हर्जन तयार करून यूट्यूब आणि सोशल मीडियावर अपलोड करत सुटला आहे. देशात सगळीकडे या ‘सोनू’ने धुमाकूळ घातला असतानाच आता पाकिस्तानमध्येही या सोनूने धडक दिली आहे.

पाकिस्तानमध्ये ‘कराची विन्झ’ (karachi vynz) हा ग्रुप असून स्टँडअप कॉमेडीसाठी हा ग्रुप प्रसिद्ध आहे. पाकिस्तानमध्ये नवाझ शरीफ यांचे पनामा पेपर प्रकरण चांगलेच गाजत आहे. या प्रकरणामुळे शुक्रवारी नवाझ शरीफ यांना सुप्रीम कोर्टाने पंतप्रधानपदासाठी अपात्र ठरवले. इम्रान खान यांच्या तेहरिक ए इन्साफ या पक्षाने सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाने हा निर्णय दिला. यावर कराची विन्झने थेट ‘सोनू’चा  आधार घेत नवाझ शरीफ यांच्यावर चिमटा काढला आहे. ‘इम्मू (इम्रान खान) हमे आप पे भरोसा सही था’ असं हे गाणं असून हे गाणे पाकमधील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फेसबुकवर चार लाख पेक्षा जास्त जणांनी हा व्हिडिओ बघितला असून ३१ हजार पेक्षा जास्त लाईक्स या गाण्याला मिळाले आहे. पाकिस्तानमधील काही मंडळींनी मात्र या गाण्यावर नाराजी व्यक्त केली आहे. ‘भारतातील गाण्यांची कॉपी करण्याऐवजी स्वत:च्या कल्पनाशक्तीला चालना द्या’ असा टोला काही मंडळींनी कराची विन्झला लगावला.