स्मार्ट फोन, स्मार्ट जग आणि सर्वकाही स्मार्ट होत असताना या काळात काही लोक मात्र या शर्यतीत बरेच मागे राहून जातात. सध्याची पिढी आणि हे जग इतक्या झपाट्याने आणि वेगाने पुढे जात आहे की, या काळाशी ताळमेळ साधताना जुन्या पिढीच्या व्यक्तींना काहीसा जास्त वेळ लागतोय. दरदिवशी अशा काही गोष्टींचा शोध लागतो की ज्या समजून घेताना भल्याभल्यांच्या नाकीनऊ येतात. तर मग, वयोवृद्ध व्यक्तींनाही या गोष्टी हाताळण्यात आणि समजून घेण्यात काही अडचणी येत असणार यात शंकाच नाही. सिनियर सिटीझन म्हणून उल्लेख केल्या जाणाऱ्या या वयोगटातील एक आजोबा सध्या सोशल मीडियावर बरेच चर्चेत आले आहेत. ते चर्चेत येण्याचं कारण आहे, मोबाईल.

अॅरिझोनातील फिनिक्स येथे राहणारे हे आजोबा सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. पहिल्यांदाच मोबाईलचा वापर करताना एखाद्या लहान मुलाच्या चेहऱ्यावर ज्याप्रमाणे कौतुकाचे आणि कुतूहलाचे भाव असतात अगदी त्याच प्रकारचे भाव त्या ८० वर्षीय आजोबांच्या चेहऱ्यावरही पाहायला मिळत आहेत. आपल्या नातवाच्या सांगण्यावरुन त्याच पद्धतीने एक- एक पायरी पार करत मोबाईल वारपताना दिसत आहेत. एखादी मौल्यवान गोष्ट हाताळताना ज्याप्रमाणे आपण तिची काळजी घेतो आणि ती अगदी नाजुकपणे हाताळतो, तसेच ते आजोबा त्यांच्या हातातील मोबाईलला हाताळत आहेत.

वाचा : …तर नजरेने घायाळ करणारी प्रिया इतकी लोकप्रिय झालीच नसती

नातवाने सांगितलेल्या पद्धतीने दूरध्वनी क्रमांक डायल करत फोन कानावर लावल्यानंतर त्यातून येणारा आवाज ज्यावेळी त्यांच्या कानावर पडतो तेव्हासुद्धा एक वेगळाच आनंद पाहायला मिळतो. हा व्हिडिओ पाहताना आपल्या आजी आजोबांची आठवण झाल्यावाचून राहात नाही. मोबाईलचे दुरुपयोग वगैरे असल्याचे म्हटले जाते हे सर्व मुद्दे पटण्याजोगे आहेत. पण, तरीही या मोबाईलमुळेच आजी- आजोबा आणि नातवंडांचं नातं वेगळ्या पद्धतीने उलगडली गेली आहेत हेसुद्धा खरं.