पांडाच्या तावडीत सापडलेल्या आठ वर्षांच्या मुलीला वाचवण्याचा थरार सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ही आठ वर्षांची मुलगी पांडासाठी बांधण्यात आलेल्या कुंपणात पडली. सुरक्षेसाठी कुंपणाची भिंत उंच बांधण्यात आल्यानं तिला बाहेर येता येईना. हे प्राणी तिला जखमी करतील या भीतीनं संग्रहालय परिसरात लोकांची आरडाओरड सुरू झाली. अखेर सुरक्षारक्षकांनी पांडाच्या तावडीतून तिला सुखरुप बाहेर काढलं.

चीनमधल्या एका संग्रहालयात ही घटना घडली. ही मुलगी खेळताना पांडासाठी बांधण्यात आलेल्या कुंपणात पडली. तिच्याभोवती तीन ते चार पांडा होते. कुंपणात अनोळखी माणूस शिरला की पांडा हल्ला करतात. अनेक संग्रहालयात पांडानं हल्ला करण्याच्या घटना घडल्या आहेत.

सुदैवानं संग्रहालयातले सुरक्षारक्षक धावून आले. त्यांनी या मुलीला कुंपणाबाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पहिला प्रयत्न अपयशी झाल्यावर आपला जीव धोक्यात घालून सुरक्षारक्षकानं तिचे प्राण वाचवले. ४७ सेंकदाची ही व्हिडिओ क्लीप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेटकरी स्वत:चा जीव धोक्यात घालून मुलीचा जीव वाचवणाऱ्या सुरक्षारक्षकाचं कौतुक करत आहेत.