भरधाव वेगातील ट्रेनला थांबवायचं झालं तर काही किलोमीटर आधीपासूनच तिचा वेग कमी करावा लागतो. त्यामुळेच ट्रेनच्या मार्गात येणारी कोणतीही गोष्ट ही उद्धवस्त होते कारण ट्रेनही गाड्यांप्रमाणे अचानक ब्रेक लावून थांबवता येत नाही. याच कारणामुळे ट्रेनचे अपघात हे फार भीषण असतात. असाच एक भीषण अपघात अमेरिकेमधील टेक्सास येथे नुकताच घडला. या अपघातामध्ये ट्रेनने एका ट्रकला धडक दिली. या घटनेचा व्हिडीओ एका प्रत्यक्षदर्शीने सोशल नेटवर्किंगवर पोस्ट केला असून तो सध्या व्हायरल झालाय.

व्हायरल व्हिडीओमध्ये एक वेगाने येणारी ट्रेन १८ चाकी सेमी ट्रकच्या मागच्या भागाला जोरदार धडक देताना दिसते. या ट्र्रकच्या मागच्या बाजूला पवनचक्कीचं एक मोठं पातं एका ठिकाणाहून दुसरीकडे नेलं जातं होतं. या अपघातामध्ये हे पातंही पूर्णपणे नष्ट झालं असून फार नुकसान झाल्याचं व्हिडीओत दिसत आहे.

हा अपघात स्थानिक वेळेनुसार दुपारी अडीचच्या सुमारास ऑस्टीन शहरापासून ५० मैलांवर असणाऱ्या ल्युइंग या उपनगराजवळ झाला. एका रेल्वे क्रॉसिंगवरुन पवनचक्कीचं लांबलचक पातं घेऊन जाणारी १८ चाकांची गाडी रुळ ओलांडत असताना हा अपघात झाला. गाडीचा पुढचा भाग म्हणजेच केबिन रुळांवरुन पुढे आलं पण ट्रेन येण्याआधी गाडीचा मागील भाग पूर्णपणे रुळावरुन पुढे आला नाही. मात्र ट्रेन फारच वेगात असल्याने ती न थांबता थेट या ट्रकच्या मागच्या भागाला धडकली ज्यावर हे पवनचक्कीचं पातं होतं. या ट्रकला दिलेली धडक इतकी जोरात होती की ट्रकचं कॅबिनेटही रस्त्यावर पडलं. सुदैवाने या अपघातामध्ये कोणतीही जिवितहानी झाली नाही.

चालक सुखरुप असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. त्याला किरकोळ दुखापत झाली आहे. अपघातानंतर बराच काळ हा ट्रक ट्रॅकवरुन हटवण्यात आला नसल्याचं न्यूजविकने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. फॉक्स न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार ट्रेनच्या इंजिनचही मोठं नुकसान झालं असलं तरी ते नक्की किती हे मात्र सांगता येणार नसल्याचं म्हटलंय.