महाराष्ट्रातील कोकण आणि परिसरातील अनेक जंगले रस्ते आणि उद्योगांच्या नावाखाली उद्धवस्त केल्याचे वृत्त काही आठवड्यांपूर्वी चर्चेचा विषय ठरले होते. प्रगतीच्या नावाखाली दिवसोंदिवस जंगल उद्धवस्त केली जात असून जंगली प्राण्यांचा नैसर्गिक अधिवास असलेल्या परिसरामध्ये माणसाचा वावर वाढत असून आता अनेक ठिकाणी जंगली भागांमध्ये वसातीही वाढल्या आहेत. त्यामुळे जंगली प्राणी मानवी वस्तीमध्ये शिरुन हल्ला करण्याचे प्रमाणही वाढले आहे. मात्र मागील काही दिवसांपासून सोशल नेटवर्किंगवर चर्चा आहे राष्ट्रीय महामार्ग ओलांडणाऱ्या वाघाच्या व्हिडिओची.

महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग सातवरील चोरबाहुली परिसरात चित्रित करण्यात एक व्हिडिओ सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला आहे. पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या परिसरातून हा महामार्ग जात असल्याने येथील वाघांना धोका निर्माण झाला आहे याचाच प्रयत्य या व्हायरल व्हिडिओमधून येतो. व्हिडिओमध्ये एक वाघ रस्त्याच्या बाजूला बराच वेळ वाट पाहिल्यानंतर हळूच डांबरी रस्ता ओलांडून पलिकडच्या झाडांमध्ये जाताना दिसत आहे. या वाघाला भरधाव जाणाऱ्या गाड्यांच्या धोक्याबरोबरच रस्त्याच्या बाजूला लावलेल्या पत्र्याच्या कुंपणाचाही धोका असल्याचे नेटकऱ्यांच म्हणणे आहे. तसेच जंगलांच्या आजूबाजूने जाणाऱ्या रस्त्यांवर वन्यप्राण्यांचा जीव धोक्यात येऊ नये म्हणून राष्ट्रीय रस्ते प्राधिकरण वन्यजीव संरक्षणासाठी उपाययोजना करत असल्याचा दावा या व्हिडिओमुळे फोल ठरल्याचे दिसत आहे असाचाही आरोप नेटकऱ्यांनी केला आहे. एका प्रवाशाने गाडीमधून हा व्हिडिओ शूट केला असून तो भारतीय वन खात्यात अधिकारी असणाऱ्या प्रविण कासवान यांनी ट्विटवर शेअर केला आहे.

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी वन्यजीव सुरक्षेचे वाभाडे काढणारा हा व्हिडिओ असल्याचे परखड मत नोंदवले आहे.

१)
वन्य प्राण्यांनी आपल्याकडून भाडे घेतले पाहिजे

२)
माणसाने केलेली घुसखोरी

३)
तिबेटप्रमाणे आपणही वन्य जिवांसाठी पूल का नाही बांधत

४)
काय गोंधळ घालून ठेवलाय आपण

५)
रोड बांधताना डोकं लावायला हवं होतं

६)
आपण एवढं अतिक्रमण केलयं की त्यांना शांततेत जगताही येत नाहीय

७)
पूल नाही तर बोगदा तरी

८)
मागच्याच आठवड्यात तीन वाघ मेलेत

९)
जंगलामध्ये रस्ता कशाला हवा

१०)
थोडं तरी शिका रे

२००८ साली मध्य प्रदेशमधील सिओनी ते महाराष्ट्रातील नागपूर शहरांना जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे चार पदरीकरण करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. यावेळी राष्ट्रीय रस्ते प्राधिकरणाने सर्वोच्च न्यायलयामध्ये पेंच व्याघ्र प्रकल्पामधून जाणाऱ्या महामार्गाच्या ९.३ किमी लांबीच्या पट्ट्यामध्ये उड्डाण पूल बांधण्यात येतील असे आश्वासन दिले. पेंच मधील वाघांना रहदारीचा त्रास होऊन त्यांच्या जिवाला धोका निर्माण होऊ नये याची काळजी घेतली जाईल असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले होते. मात्र दिलेली आश्वासने दूरच पण वाघांना रस्ता ओलांडता यावा म्हणून रस्त्याच्या बाजूला कुंपण न लावण्याचे औदार्यही अधिकाऱ्यांनी दाखवलेले नाही. अधिकाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे वाघांना अभयारण्यातून जाणारे रस्ते ओलांडण्यासाठी पत्र्याच्या कुंपणांवरुन उड्या मारुन जावे लागत आहे.