रविचंद्रन आश्विन हा भारतीय संघातला महत्वाचा फिरकीपटू आहे. काही वर्षांपूर्वी आश्विन आणि जाडेजा या फिरकी जोडगोळीने प्रतिस्पर्धी फलंदाजांना अक्षरश: आपल्या तालावर नाचवलं आहे. गुगली, कॅरम बॉल या आपल्या ठेवणीतल्या अस्त्रांमुळे आश्विन नेहमी वरचढ राहिलेला आहे. लहानपणीही आश्विन गोलंदाजीत अशीच कामगिरी करायच्या. गोलंदाजीतल्या या कौशल्यामुळे आश्विनचं विरोधी संघाने सामन्याआधी एकदा अपहरण केलं होतं. खुद्द आश्विनने याबद्दलचा खुलासा केला आहे.

“आमचा संघ टेनिस बॉलच्या एका क्रिकेट स्पर्धेत अंतिम फेरीत पोहचला होता. मी सामन्यासाठी घरातून निघालो, इतक्यात एका गाडीवर चार-पाच मुलं आली. दिसायला ती हट्टीकट्टी होती. त्यांनी मला विचारलं तू सामना खेळण्यासाठी जात आहेस ना?? मला वाटलं मला आणण्यासाठी त्यांनी खास गाडी पाठवली आहे…मी देखील कोणताही विचार न करता त्यांच्यासोबत निघालो. त्यावेळी मी अंदाजे १४-१५ वर्षांचा असेन…त्यांनी चेन्नईत एका चहाच्या दुकानासमोर गाडी थांबवली. तिकडे मला वडा-भजी जे हवं ते खायला दिलं…त्यातला एक म्हणाला की घाबरु नको आम्ही तुझी मदतच करतोय. ज्यावेळी सामना सुरु होण्याची वेळ आली, त्यावेळी मी उठलो, तर समोरच्या मुलांनी मला पुन्हा बसवलं. आम्ही विरोधी संघातले आहोत, तू अंतिम सामना खेळायचा नाहीस…जर सामना खेळलास तर पुढच्या वेळी बॉल टाकण्यासाठी तुझी बोटचं शिल्लक राहणार नाहीत”, आश्विन Cricbuzz संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत बोलत होता.

न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेसाठी आश्विनची भारतीय संघात निवड झालेली आहे. २१ फेब्रुवारीपासून या मालिकेला सुरुवात होणार आहे. कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत आपलं अव्वल स्थान कायम राखण्यासाठी भारताला या मालिकेत विजय मिळवणं गरजेचं आहे. त्यामुळे या मालिकेत भारतीय संघ कशी कामगिरी करतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.