अमेरिकेतील न्यूरोसायंटीस्ट जीवनदीप कोहली यांच्या पगडीची सध्या सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू आहे. याचं कारणंही तसंच काही आहे. नुकताच त्यांनी सप्तरंगी पगडी घातलेला आपला फोटो ट्विट केला आणि त्यानंतर त्यांच्या पगडीची चर्चा सुरू झाली. चक्क अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनीदेखील त्यांच्या या पगडीची दखल घेतली.

यावर्षी प्राईड ऑफ मंथ साजरा करताना जीवनदीप कोहली यांनी सप्तरंगी पगडी घातली होती. याचा फोटो त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला. दाढी असलेला बायसेक्स्शुअल न्यूरोसायंटीस्ट असल्याचा आपल्याला अभिमान आहे. आपली ओळख असलेले सर्व पैलू व्यक्त करण्यासाठी आपण सक्षम आहोत यासाठी मी स्वत:ला भाग्यशाली समजत असल्याचे त्यांनी ट्विटमध्ये नमूद केले आहे. यावर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनीदेखील ट्विट करत त्यांच्या कार्याबद्दल धन्यवाद दिले आहेत.

जीवनदीप यांनी 2 जून रोजी हे ट्विट केलं होतं. त्यांच्या ट्विटला सध्या 3 लाखांपेक्षा अधिक लाईक्स आणि 52 हजारांपेक्षा अधिकवेळा रिट्विट करण्यात आलं आहे. दुसऱ्या ट्विटमध्ये जीवनदीप यांनी आपण ही पगडी घालण्यासाठी अनेक दिवस सराव केल्याचंही सांगितलं आहे. तसेच ही पगडी बांधण्यासाठी खुप वेळ खर्च करावा लागल्याचेही ते म्हणाले. अमेरिकेत प्राईड ऑफ मंथ एका अभियानाप्रमाणे आहे. याची सुरूवात 1 जून पासून केली जाते. 1969 मध्ये जून महिन्यात न्यूयॉर्कमधील स्टोनवेल येथे हिंसाचार झाला होता. समान अधिकारांसाठी करण्यात आलेल्या आदोलनात हे महत्त्वाचे वळण ठरले होते. याची आठवण म्हणून एलजीबीटीक्यू ही संस्था समानतेच्या अधिकाराच्या मोहिमेत योगदान देणाऱ्या लोकांना यादरम्यान बोलावत असते.