देशाच्या विविध भागांमध्ये करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे लॉकडाउन सदृश्य परिस्थिती आहे. या लॉकडाउनमुळे नागरिकांना अनेक गैरसोईचा सामना करावा लागत आहेत. लोकांनी आपली महत्त्वाची अशी कामं पुढे ढकलली आहेत. मग ती नोकरी असेल किंवा लग्न. मात्र एका जोडप्याने या लॉकडाउनला आपल्या लग्नाच्या मध्ये येऊ दिलेलं नाही. करोनाच्या नियमांमुळे या जोडप्याने चक्क हवेत लग्नाची हौस पूर्ण केली आहे.

तमिळनाडूच्या मदुराई येथे विमानात हे लग्न पार पडले. या जोडप्याने आपल्या नातेवाईकांसोबत हा विवाह सोहळा पार पाडला. तमिळानाडूमध्ये वाढत्या करोना रुग्णांच्या संख्येमुळे मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी २४ ते ३१ मे पर्यंत राज्यात लॉकडाउन करण्याचा निर्णय घेतला आहे.

मदुराई येथे राहणाऱ्या राकेश आणि दिक्षा यांनी विमानामध्ये आपली लग्नगाठ बांधली. त्यांनी स्पाइसजेटचे एक चार्टर्ड विमान भाड्याने घेतलं होतं. त्यामध्ये १३० नातेवाईकांसोबत हवेमध्ये त्यांनी हे लग्न पार पाडले. लॉकडाउन लागण्याआधीच त्यांनी हा कार्यक्रम पूर्ण केला. दोन तासांसाठी भाड्याने घेतलेल्या या विमानामध्ये त्यांनी बंगळुरू ते मदुराई आणि पुन्हा मदुराई ते बंगळुरू असा प्रवास केला होता.

या विमानामध्ये उपस्थित असणाऱ्या सर्व नातेवाईकांची करोना चाचणी करण्यात आली होती. सर्वांची चाचणी ही निगेटिव्ह आली होती आणि त्याची माहिती अधिकाऱ्यांना देखील देण्यात आली होती. त्यानंतर नातेवाईकांना विमानात प्रवेश देण्यात आली अशी माहिती राकेशने दिली.

दरम्यान, मदुराई येथून स्पाइसजेटचे चार्टर्ड विमान भाड्याने घेण्यात आले होते. विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना या हवेतील विवाह सोहळ्याबद्दल माहिती नव्हती असे विमानतळाच्या संचालकांनी सांगितले.