महिंद्रा अँड महिंद्राचे चेअरमन आनंद महिंद्रा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर नेहमीच अ‍ॅक्टिव्ह असतात. नेहमी मजेशीर ट्विट्स करत असल्याने त्यांची फॅन फॉलोइंगही मोठ्या प्रमाणात आहे. अनेकदा नेटकऱ्यांच्या ट्विटला ते असं उत्तर देतात की समोरच्याची बोलती बंद होते. पण, यावेळी स्वतः आनंद महिंद्रांनी ट्विट करुन स्वतःचीच बोलती बंद झाल्याचं म्हटलंय.

आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर एक फोटो शेअर केलाय. यामध्ये दोनप्रकारचे फेस मास्क दिसत आहेत. त्यातील एका फेस मास्कवर मुलाकडील (लड़के वाले) आणि दुसऱ्या फेस मास्कवर मुलीकडील (लड़की वाले) असा उल्लेख केलाय. या अनोख्या आणि स्टायलिश फेस मास्कचा फोटो पाहून आनंद महिंद्रांनी…मला कळत नाहीये मी आश्चर्यचकीत व्हावं की घाबरावं…खरंच हे मास्क पाहून माझी बोलती बंद झाली असं ट्विट केलं.

हे मास्क विशेषतः लग्नासाठी डिझाइन केल्याचं समजून येत आहे. म्हणजे लग्नात एकमेकांचा चेहरा बघून नाही तर मास्क पाहून कोण मुलीकडचे आणि कोण मुलाकडचे आहेत हे ओळखता येईल. आनंद महिंद्रांच्या या ट्विटवर अनेक मजेशीर प्रतिक्रिया येत आहेत. एका युजरने लग्नाची पत्रिका शेअर केली आहे. या पत्रिकेत सॅनिटायझर देण्यात आलं आहे, जेणेकरुन लग्नपत्रिका उघडताच तुमच्या हातात पहिले सॅनिटायझर येईल. अन्य एका युजरने, ‘ही मास्कची पद्धत राजकारणातही आणवी…विचार करा सरकार आणि विरोधीपक्ष संसदेत कसे दिसतील’, असं म्हटलंय. अनेकांनी आमिर खानच्या थ्री इडियट्स सिनेमातील एक फोटो शेअर केलाय. यामध्ये चित्रपटातील तीन मुख्य कलाकार निमंत्रण नसलेल्या लग्नात पोहोचतात, आता अशा पाहुण्याचं काय होणार असा मजेशीर प्रश्नही एका युजरने विचारलाय.


आनंद महिंद्रांचं हे ट्विट आतापर्यंत जवळपास 1000 जणांनी रिट्विट केलंय, तर 15 हजारांपेक्षा जास्त युजर्सनी ते लाइक केलं आहे.