‘कॅप्टन कूल’ नावाने ओळखला जाणारा महेंद्रसिंह धोनी हा संपूर्ण देशवासियांच्या गळ्यातला ताईत बनलेला आहे. भारताच्या प्रत्येक राज्यात धोनीचे अनेक चाहते आपल्याला भेटतील. देशासोबतच परदेशातही धोनी तितकाच लोकप्रिय आहे. कोणताही सामना असो धोनीचे चाहते आपल्या लाडक्या खेळाडूची एक झलक पाहण्यासाठी मैदानात गर्दी करतात. पश्चिम बंगालमधला धोनीचा असाच एक चाहता सध्या चांगलाच चर्चेत आला आला आहे.
पश्चिम बंगालमधील अलिपूरदर जिल्ह्यातील ‘एमएस धोनी हॉटेल’ हे धोनीच्या चाहत्यांना फुकटात जेवण देतं आहे. हॉटेलचे मालक शंभुनाथ बोस यांनी ही माहिती दिली. शंभुनाथ हे स्वतः धोनीचे चाहते आहेत. शंभुनाथ बोस यांचं हॉटेल हे पारंपरिक बंगाली खाद्यपदार्थांसाठी प्रसिद्ध आहे. आपल्या छोटसं हॉटेल शंभुनाथ बोस यांनी धोनीच्या पोस्टर्सने सजवलं आहे.
“या दुर्गापुजेच्या दिवशी माझ्या हॉटेलला दोन वर्ष पूर्ण होत आहेत. ही जागा आता इथल्या लोकांना चांगलीच परिचीत आहे. इथे कोणालाही धोनी हॉटेलबद्दल विचारलत तर तुम्ही योग्य जागी येऊन पोहचाल. मी धोनीच्या खेळाचा चाहता आहे, त्याच्यासारखा खेळाडू मी पाहिलेला नाही. त्याच्या अनेक खेळी या माझ्यासाठी प्रेरणादायी आहेत. त्याने एकदा माझ्या हॉटेलमध्ये येऊन माझ्या हातचे पदार्थ खावेत अशी माझी इच्छा आहे. त्याला माशांचं कालवण आणि भात आवडतो असं मी ऐकलंय, हे खाण्यासाठी त्याने कधीही माझ्या हॉटेलमध्ये यावं.” बोस IANS वृत्तसंस्थेशी बोलत होते.
भारतीय क्रिकेट संघाच्या इतिहासात सौरव गांगुलीनंतर महेंद्रसिंह धोनी सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून ओळखला जातो. धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने २००७ साली टी-२० तर २०११ साली वन-डे विश्वचषक जिंकला होता. यंदाही धोनी विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाकडून खेळतो आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 14, 2019 9:59 am