23 February 2018

News Flash

विषय संपला… रसगुल्ला पश्चिम बंगालचाच!

ओडिशासोबतच्या वादावर अखेर पडदा

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: November 14, 2017 3:49 PM

रसगुल्ला नेमका कोणत्या प्रांताचा यावरून पश्चिम बंगाल आणि ओडिशा यांच्यामध्ये सुरु असलेल्या वादावर अखेर पडदा पडला आहे. रसगुल्ला हा पश्चिम बंगालचाच असल्याचा निकाल मंगळवारी देण्यात आला. पश्चिम बंगालला याबाबतचे ‘जिओग्राफिकल इंडिकेशन’ही (जीआयटी) मिळाले आहे. त्यामुळे रसगुल्ला ही मिठाई पश्चिम बंगालची ओळख असल्याचे स्पष्ट झाले.
रसगुल्ल्याची रेसिपी ओडिसामधून पश्चिम बंगालमध्ये पोहोचली होती, असा दावा ओडिशाने केला होता. मात्र हा दावा चुकीचा असल्याचे स्पष्ट झाले आहे. या निर्णयामुळे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आनंद व्यक्त केला. ही संपूर्ण राज्यासाठीच आनंदाची बाब असून मागील अनेक वर्षांपासून या विषयावर दोन्ही राज्यांमध्ये वाद सुरु होता, असेही बॅनर्जी यांनी सांगितले.

पुरीमधील जगन्नाथाच्या मंदिरात रसगुल्लाच्या रेसिपीला सुरुवात झाली, असा ओडिशातील लोकांचा समज आहे. हा रसगुल्ल्याचा वाद सुरु झाल्यावर दोन वर्षांपूर्वी ओडिशाने रसगुल्ल्याचा ‘जिओग्राफीकल इंडिकेशनही टॅग’ मिळविण्याचा प्रयत्न केला. जीआयटी टॅग म्हणजे ती वस्तू त्या विशिष्ट ठिकाणची असल्याची ओळख असते. दोन राज्यांमधला हा वाद न्यायालयात गेल्यावर याविषयीचा अभ्यास करुन त्यातील ठोकताळे पडताळून निर्णय देण्यात आला. ओडिशाकडून विनाकारण हा रसगुल्ल्याचा वाद वाढविण्यात आल्याचेही बॅनर्जी यांच्या मंत्रिमंडळातील पार्थ चॅटर्जी म्हणाले. दोन्ही राज्यांमध्ये याबाबतचा अभ्यास करण्यासाठी विशेष समित्या नेमण्यात आल्या होत्या.

सर्वांचे तोंड गोड करणारा रसगुल्ला मूळचा पश्चिम बंगालचाच पदार्थ आहे, यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. १८६८ मध्ये नबीनचंद्र दास यांनी ही मिठाई तयार करण्यास सुरुवात केली. त्यानंतर या मिठाईची प्रसिद्धी झाल्याचे एकूण संशोधनातून समोर आले. आता या दोन्ही राज्यांमध्ये रसगुल्ला मिळतो. मात्र त्यात काही प्रमाणात फरक असतो. ओडिशाचा रसगुल्ला मोठा असतो तसेच तो शुभ्र पांढरा नसून, मोतिया रंगाचा असतो. तर पश्चिम बंगालचा रसगुल्ला तुलनेने लहान आकाराचा आणि एकदम पांढऱ्या रंगाचा असतो.

First Published on November 14, 2017 3:49 pm

Web Title: west bengal wins the rosogolla battle with odisha
  1. No Comments.