एखाद्या व्यक्तीचे प्राण वाचवल्यानंतर जो आनंद मिळतो तो शब्दात मांडणं खुप कठिण आहे. अशीच एक घटना मुंबईजवळील विरार रेल्वे स्थानकावर रविवारी पहायला मिळाली. या घटनेचा एक व्हिडीओ सध्या सर्वांच्याच चर्चेचा विषय ठरत आहे. विरार रेल्वेस्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर अचानक रिक्षा आलेली पाहिल्यानंतर सर्व प्रवाशांमध्ये गोंधळाचं वातावरण पसल्याचं पहायला मिळालं. परंतु काही वेळाने ती रिक्षा कोणत्या कारणासाठी प्लॅटफॉर्म आली हे समजल्यानंतर प्रवाशांच्या चेहऱ्यावरही समाधान पहायला मिळालं. पावसाचं पाणी रेल्वे ट्रॅकवर साचल्यामुळे बराच वेळ उभ्या असेलेल्या लोकलमधील एका महिलेला प्रसव कळा सुरू झाल्या होत्या. सदर महिला रुग्णालयात जाण्यासाठीच ट्रेनने जात होती. परंतु अचानक तिला प्रसव कळा सुरू झाल्यानं विरार स्थानकाबाहेर उभ्या असलेल्या रिक्षा चालकाची मदत मागण्यात आली.

रविवारी एक गर्भवती महिला रुग्णालयात जात असतानाच अचानक ट्रेनमध्ये तिला प्रसव कळा सुरू झाल्याने तिच्या पतीने रिक्षा चालकाची मदत घेण्याचा निर्णय घेतला. तिच्या पतीने रिक्षा चालकाला प्लॅटफॉर्मवर रिक्षा आणण्याची विनंती केली. त्यानंतर सदर रिक्षा चालकाने त्यांच्या विनंतीला मान देत रिक्षा ट्रेनच्या डब्यापर्यंत नेऊन सदर महिलेला रुग्णालयापर्यंत पोहोचवले. दरम्यान, प्लॅटफॉर्मवर उभ्या रेल्वे पोलिसांनी त्यावेळी संबंधित रिक्षा चालकाला अटक केली नाही.

सोमवारी त्या रिक्षा चालकाला अटक करण्यात आली. परंतु न्यायालयाने त्याला ताकीद देऊन सोडून दिलं. सदर महिलेला मदत करून आनंद झाला असल्याची प्रतिक्रिया सदर रिक्षा चालकाने दिली. दरम्यान, त्या महिलेने रूग्णालयात गोंडस मुलीला जन्म दिला. त्या रिक्षा चालकानं केलेलं काम हे नक्कीच चांगलं आहे. परंतु ते नियमांच्या विरोधात असल्याने त्याला अटक करावी लागली. महिलेच्या पतीने रेल्वे कर्मचाऱ्यांकडे मदत मागायला हवी होती असे, रेल्वे पोलीस दलातील इन्स्पॅक्टर प्रविण यादव यांनी सांगितलं.