प्लॅस्टिकच्या वापरामुळे पर्यावरणाची हानी होत असल्यामुळे अनेक देशांमध्ये प्लॅस्टिकच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. मात्र तरीदेखील अनेक जण या नियमांचे उल्लंघन करून प्लॅस्टिकचा सर्रास वापर करताना दिसून येतात. परिणामी प्लॅस्टिकच्या वापरामुळे पर्यावरणाच्या हानीबरोबरच सजीव घटकांवरही त्याचा अनिष्ट परिणाम होत असल्याचे पाहायला मिळत आहेत. इतकंच नाही तर याचा प्रत्यय नुकताच थायलंडमध्ये पाहायला मिळाला आहे.

प्लॅस्टिक वापरावर बंदी घातली असली तरी या प्लॅस्टिकच्या पिशव्या सर्वत्र पाहायला मिळतात. त्यातच अन्नाच्या शोधात असलेली मुकी जनावरे या पिशव्या खाद्यपदार्थ समजून  खातात. या पिशव्या खाल्ल्यानंतर त्याचा पचनसंस्थेवर विपरीत परिणाम होतो. परिणामी त्यांना प्राणही गमवावे लागतात. याच पिशव्या खाल्ल्यामुळे थायलंड येथे एका व्हेलमाशाला त्याचे प्राण गमवावे लागले आहेत.

थायलंडमधील सोंगखला या भागात एका व्हेल माशाचा मृत्यू झाला आहे. हा मासा एका कालव्याद्वारे सोंगखला या भागात वाहून आला होता. ज्यावेळी हा व्हेल मासा या भागात आढळून आला तेव्हाच तो अत्यावस्थेत असल्याचे येथे उपस्थित असलेल्या लोकांना दिसून आले होते. त्यामुळे येथील लोकांनी डॉक्टरांच्या मदतीने व्हेलला वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र या माशाच्या पोटात प्लॅस्टिकचे प्रमाण जास्त झाल्यामुळे त्याचे प्राण वाचविता आले नाही. डॉक्टरांनी पाच दिवस अथक प्रयत्न केले मात्र तरीदेखील हा मासा मरण पावला.

व्हेल माशाची तपासणी करत असताना डॉक्टरांना त्याच्या पोटात ८ किलो वजनाच्या ८० प्लॅस्टिकच्या पिशव्या आढळून आल्या. या पिशव्यांचे प्रमाण जास्त झाल्यामुळे व्हेलची पचनसंस्था बिघडली. पिशव्यांचे पचन न झाल्यामुळे व्हेलचा यात मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, थायलंड सरकारने नागरिकांना प्लॅस्टिकचा कमीतकमी वापर करावा अशी विनंती केली आहे, मात्र त्याचा फारसा परिणाम झाला नसल्याचे या घटनेवरुन दिसून आले.