करोनामुळे गेली चार महिने आंतरराष्ट्रीय क्रिकेट बंद होते. अखेरीस इंग्लंड – वेस्ट इंडिज क्रिकेट मालिकेने ते सुरू झाले. पहिली कसोटी इंग्लंडमध्ये खेळवण्यात आणि त्यात वेस्ट इंडिजने विजय मिळवला. पण भारतीय संघ मात्र अजूनही घरातच आहे. भारतीय संघातील खेळाडूंसाठी लावण्यात येणारे सराव आणि प्रशिक्षण शिबीर सध्या तरी आयोजित करण्यात येणार नाही, असे BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीने स्पष्ट केले आहे. तसेच ऑगस्टपर्यंत नियोजित असलेले भारताचे क्रिकेट दौरेदेखील रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे क्रिकेटपटू घरात बसून आहेत. पण सध्या एका देवमाशाचा रग्बी खेळतानाचा व्हिडीओ चर्चेत आला आहे.

खेळांमध्ये एक असामान्य शक्ती असते. विविध प्रकारच्या लोकांना एकत्र आणण्याचे सामर्थ्य खेळात असते, हे तर आपण पाहिलेच आहे. पण जर एखाद्याने आपल्याला सांगितले की खेळामुळे केवळ माणसंच नव्हे तर प्राण्यांशीही मैत्री होते, तर… बरेच लोक यावर विश्वास ठेवणाक नाहीत, पण एक व्हिडीओ पाहून तुम्हाला नक्की यावर विश्वास बसेल. भारताचा ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विनने ट्विटरवर बेलूगा व्हेलसोबत (देवमासा) एक व्यक्ती रग्बी खेळतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. एका छोटेखानी जहाजावर बसलेला माणूस बेलुगा व्हेलसोबत रग्बी खेळताना व्हिडीओमध्ये दिसतो आहे. महत्त्वाचे म्हणजे समुद्राच्या मध्यभागी असताना माणसाने दूरवर फेकलेला रग्बीचा चेंडू तो देवमासा त्या माणसाला पुन्हा जहाजाजवळ आणूनही देत आहे आणि खेळाचा आनंद लुटत आहे, असं व्हिडीओत दिसत आहे.

देवमाशाचा हा व्हिडीओ लाइफ ऑन अर्थ या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करण्यात आला आहे. तो व्हिडीओ आपल्या अकाऊंटवर शेअर करत अश्विनने या सुंदर व्हिडीओबद्दल प्रेम वाटत असल्याचे इमोजी वापरले आहेत.