देशाची अर्थव्यवस्था रुळांवर आणण्यासाठी २० लाख कोटींची आर्थिक मदतीची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केली. आर्थिक सुधारणा वेगाने लागू करण्यात येतील आणि लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्याचे स्वरूप नवे असेल, असे पंतप्रधानांनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात स्पष्ट केले. यावेळेस त्यांनी ‘आत्मनिर्भर भारत’ होण्याची गरज असल्याचे म्हटले. या भाषणामध्ये मोदींनी अनेकदा आत्मनिर्भर या शब्दाचा उच्चार केला. मात्र या शब्दाचा नेमका अर्थ काय हे जाणून घेण्यासाठी गुगलवर भारतीयांच्या अक्षरशः उड्या पडल्या. मोदींनी आत्मनिर्भर हा शब्द त्यांच्या भाषणाला सुरुवात केल्यानंतर चौथ्या मिनिटाला पहिल्यांदा वापरला. २१ व्या शतकामध्ये आत्मनिर्भर भारत हा एकमेव उपाय आहे असं मोदी म्हणाले. तेव्हापासून गुगलवर आत्मनिर्भर (aatm nirbhar) या शब्दासंदर्भातील सर्व सर्वाधिक वाढल्याचे दिसत आहे. त्यातही कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र, तेलंगण, दिल्ली या पाच राज्यांमध्ये सर्वाधिक लोकांनी हा शब्द मागील १२ तासांमध्ये सर्च केल्याचे गुगल ट्रेण्डसवरुन दिसून येत आहे.

नक्की काय म्हणाले मोदी?

करोनापूर्वीचे आणि नंतरचे जग बदललेले असेल. अशा वेळी विश्वाला पुढील मार्ग दाखवण्याचे काम भारताला करावे लागेल. करोनाआधी भारताकडे पीपीई, एन-९५ मास्क नव्हते. दररोज आता २ लाख पीपीई, २ लाख एन-९५ मास्क बनवले जात आहेत. जागतिकीकरणात आत्मनिर्भरतेचा अर्थ बदललेला असेल. त्या अर्थाने २१ शतक भारताचेच असेल. भारत विश्वाला कुटुंब मानतो. देशाची आत्मनिर्भरता आत्मकेंद्रित कधीच नव्हती. टीबी, कुपोषण, पोलिओ विरोधातील लढा जगावर प्रभाव टाकतो. भारताची औषधे जगाला नवी आशा देतात. जग भारताची प्रशंसा होते. मानवजातीच्या कल्याणासाठी १३० कोटी देशवासीयांचा आत्मनिर्भर होण्याचा संकल्प विश्वाला बरेच काही देऊ शकतो, असं मोदी जनतेशी संवाद साधताना म्हणाले.

नक्की पाहा >> Viral Memes: “कोणीतरी हिंदीची डिक्शनरी द्या रे”, “मोदींचं हिंदी ऐकून देश आणखीन गोंधळला”

मोदींनी आत्मनिर्भर या शब्दाचा उल्लेख केल्यानंतर १५ मिनिटांच्या आत हा शब्द सर्वाधिक सर्च झाल्याचे गुगल ट्रेण्डवरुन दिसून येते. रात्री आठ वाजून १८ मिनिटांनी म्हणजेच मोदीं बोलत असतानाच भारतीयांनी या शब्द सर्च सर्वाधिक सर्च केला.


सर्वाधिक सर्च करणारी राज्ये कोणती?

आत्मनिर्भर हा शब्द सर्वाधिक सर्च करणाऱ्यांमध्ये दक्षिण भारतामधील राज्य प्रामुख्याने अढळून आली. विशेष म्हणजे हा शब्द सर्वाधिक सर्च करणाऱ्या राज्यांच्या यादीमध्ये महाराष्ट्र तिसऱ्या स्थानी असल्याचे गुगल ट्रेण्ड्सवर दिसते. आत्मनिर्भर (aatm nirbhar) हे सर्वाधिक सर्च कर्नाटकमधून झाले. त्या खालोखाल दुसऱ्या क्रमाकांवर गोवा, तिसऱ्यावर महाराष्ट्र, चौथ्यावर तेलंगण तर पाचव्या क्रमांकावर दिल्लीचा समावेश होता. याचबरोबर उत्तराखंड, गुजरात, हरियाणा, छत्तीसगड, झारखंड, राजस्थान, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, पंजाब, बिहार, केरळ, आसाम, पश्चिम बंगाल आणि ओदिशा या राज्यांचा क्रमांक हा शब्द सर्वाधिक वेळा सर्च करणाऱ्या राज्यांच्या यादीत लागतो.

Video >> ‘२० लाख कोटींमध्ये किती शून्य असतात?’; संबित पात्रांना लाइव्ह शोमध्ये विचारला प्रश्न, पात्रा म्हणाले…

हिंदी पट्ट्यातही सर्चचे प्रमाण अधिक

विशेष म्हणजे आंध्र प्रदेश, केरळ, पंजाब, आसाम आणि पश्चिम बंगाल या हिंदी पट्ट्यातील राज्यांपेक्षा उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश या दोन प्रमुख राज्यांमध्ये हा हिंदी शब्द अधिक जणांनी सर्च केला. नेटकऱ्यांनीही ट्विटवरुन मोदी वापरत असलेली हिंदी दक्षिण भारतालाच काय तर हिंदी पट्ट्यातील राज्यांनाही समजणार नाही अशी टीका केल्याचे पहायला मिळालं.

दरम्यान मोदींनी वापरलेल्या हिंदीवरुन आणि आत्मनिर्भर या शब्दावरुन सोशल मिडियावरही चांगलीच चर्चा रंगल्याचे चित्र दिसत आहे. अनेकांनी यावरुन अनेक भन्नाट मिम्स व्हायरल केले आहेत.