सोशल मीडियाची जशी वाईट बाजू आहे. तशीच चांगली बाजूही आहे. हे अलीकडेच घडलेल्या सुखद घटनेनं दाखवून दिलं. काश्मीरमध्ये १९४७ मध्ये झालेल्या कबायली हल्यात बहिण-भाऊ एकमेकांपासून दुरावले. पण, तब्बल ७२ वर्षानंतर राजस्थानमध्ये राहणारे रणजीत सिंह आणि पाकिस्तानात राहणारी भज्जो (सकीना) यांची व्हॉट्सअॅपमुळे भेट झाली.

सोशल मीडियावर सध्या या बहिण-भावाची जोरदार चर्चा सुरू आहे. राजस्थानमधील श्रीगंगानगरमध्ये राहणाऱ्या रणजीत सिंह यांच्या कुटुंबीयांनी रविवारी भज्जो आणि त्यांच्या कुटुबीयांसोबत व्हिडिओ कॉलवरुन चर्चा केली. आता दोन्ही कुटुंब लवकरच करतारपूरमध्ये भेटणार आहेत.

रायसिंह नगरचे रहिवासी अॅडव्होकेट हरपाल सिंग सूदन, पाकव्याप्त काश्मीरातील जुबेर आणि पुंछमधील तरुणी रोमी शर्मा या तिघांमुळे या बहिण भावाची भेट झाली आहे. या तिघांनी कुटुंबापासून विभक्त झालेल्या लोकांसाठी व्हॉट्सअॅप ग्रुप बनवला होता. १९४७ मध्ये काश्मीरमध्ये झालेल्या कबायली हल्यात लंबरदार मतवालसिंग यांचे कुटुंब बेघर झाले. मतवालसिंग यांचे कुटुंबीय सध्या राजस्थानमधील रायसिंह नगरमध्ये राहते. तर बहिण भज्जो पाकिस्तानात सकीना नावाने वास्तव्यास आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना हरपालसिंग म्हणाले की, ‘एकदा रणजित सिंग त्यांच्या घरी आले होते. नेहमीप्रमाणे आमच्या गप्पा रंगल्या असता बोलण्या-बोलण्यात मी त्यांना व्हॉट्सअॅप ग्रुपबद्दल सांगितलं. व्हॉट्सअॅप ग्रुप बनवला असून, त्यात पाकिस्तान आणि पुंछमधील काही लोक आहेत. तेव्हा रणजितने १९४७ मध्ये हरवलेली बहिण भज्जोबदल सांगितले. त्यानंतर भज्जो पाकिस्तानात असून, त्यांचे नाव आता सकीना असल्याचे समजले. त्यानंतर दोन्ही कुटुंबीयांनी व्हॉट्सअॅपवरून व्हिडीओ कॉलद्वारे चर्चा केली.