सोशल मीडिया हा सध्या अनेकांच्या गळ्यातील ताईत आहे. यातही व्हॉटसअॅपशिवाय जगण्याचा अनेक जण विचारही करु शकत नाहीत. एखादा महत्त्वाचा निरोप देण्यापासून ते परदेशातील व्यक्तीशी संपर्क करण्यापर्यंत अनेक कामे व्हॉटसअॅपमुळे सोपी झाली आहेत. एकमेकांना फोटो, व्हिडीयो किंवा फाईल पाठवणे, लोकेशन शेअर करणे, फोन किंवा व्हिडीयो कॉलिंग करणे अशा अनेक गोष्टी व्हॉट्सअॅपमुळे सहज शक्य झाल्या आहेत. व्हॉट्सअॅपची पॅरेंट कंपनी फेसबुक आहे. याच व्हाट्सअॅपचे सह-संस्थापक जेन कॉम यांनी फेसबुकला सोडचिठ्ठी देण्याची घोषणा नुकतीच केली आहे. कॉम यांनी २०१४ मध्ये व्हॉट्सअॅप फेसबुकला विकले होते. विशेष म्हणजे त्यांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहून आपला हा निर्णय कळवला आहे. आपल्याला स्वत:साठी काही वेळ द्यायचा आहे, त्यासाठी आपण हे पद सोडत आहोत असे त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.

अमेरिकेच्या प्रसारमाध्यमांनी याबाबतची बातमी प्रसिद्ध केली असून त्याने अशापद्धतीने पदाचा राजीनामा देण्यामागच्या कारणांना उधाण आले आहे. फेसबुक डेटा लीक प्रकरणानंतर त्यांनी हा निर्णय घेतल्याने सोशल मीडियावर आणि सर्वत्र कॉम यांच्या राजीनाम्याबद्दल जोरदार चर्चा सुरु आहे. कॉम यांनी वैयक्तिक कारण दिले असले तरीही त्यामागे व्यावसायिक मतभेद असण्याची शक्यता आहे. कॉम यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे, ‘सुमारे १० वर्षांपूर्वी ब्रायन एक्टन यांच्यासोबत मी व्हाट्सअॅपची सुरूवात केली. हे काम करताना चांगल्या लोकांसोबत काम केले आणि हा प्रवास अतिशय चांगला होता. आता याच्या पुढे पाऊल टाकण्याची वेळ आली आहे.’ ब्रायन यांनीही गेल्याच वर्षी फेसबुक सोडले होते, त्यानंतर आता कॉम यांनी व्हॉट्सअॅपचे पद सोडले आहे.

आज व्हाट्सअॅपची टीम ही पहिल्यापेक्षाही अधिक मोठी आणि सक्षम आहे. सध्या आयुष्यातील काही काळ मी तंत्रज्ञानापासून दूर राहू इच्छितो. या काळात मला माझ्या कारने खूप प्रवास करायचा आहे, तसेच वेगवेगळे खेळही खेळायचे आहेत. इतकेच नाही तर आपला जीवनप्रवास सुंदर केल्याबद्धल त्यांनी फेसबुकचे आभारही मानले. कॉम पुढे म्हणाले, ‘मी अशा वेळी कंपनी सोडत आहे, जेव्हा लोक माझ्या कल्पनेपेक्षाही मोठ्या प्रमाणात व्हाट्सअॅपचा वापर करु लागले आहेत. तर या पोस्टला प्रतिक्रिया देताना फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्गने म्हटले आहे, मला कायमच जेन कॉमची कमी जाणवेल. जगभरातील लोकांना एकमेकांशी जोडण्यासाठी आपण जे केलेत त्याचे खऱ्या अर्थाने कौतुक आहे. तसेच आपल्याकडून मला अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या त्याबद्दल धन्यवाद.