होळी म्हणजे आपआपसातील मतभेद विसरुन एकत्र येत रंगांमध्ये रंगून जाण्याचा दिवस. असाच एक संदेश कपडे धुण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ‘सर्फ एक्सेल’ या पावडर कंपनीने आपल्या एका होळी स्पेशल जाहिरातीमधून देण्याचा प्रयत्न केला. मात्र आता याच जाहिरातीवरुन ‘सर्फ एक्सेल’चे प्रोडक्ट वापरू नका अशा अर्थाचा #BoycottSurfExcel हा हॅशटॅग ट्विटवर ट्रेण्ड होताना दिसत आहे. हिंदू मुलगी आणि मुस्लिम मुलगा या जाहिरातीमध्ये दाखवण्यात आल्याने अनेकांनी या जाहिरातीवर आक्षेप नोंदवला आहे. मात्र जाहिरातीला विरोध दर्शवणाऱ्या काही अती उत्साही लोकांनी ‘सर्फ एक्सेल’ला विरोध दर्शवताना गुगल प्लेवर ‘मायक्रोसॉफ्ट एक्सेल’च्या अॅप्लिकेशनला कमी रेटींग दिल्याचे समोर आले आहे.

#BoycottSurfExcel हा हॅशटॅग वापरत अनेकांनी ‘सर्फ एक्सेल’ने धार्मिक भावना दुखवाल्याचे म्हटले आहे. मात्र विरोध करणाऱ्यांपैकी काहींनी चक्क ‘सर्फ एक्सेल’च्या चुकीची शिक्षा ‘मायक्रोसॉफ्ट एक्सेल’ला दिली आहे. नावामधील साधर्म्य असल्यामुळे काही लोकांनी थेट गुगल प्लेवर ‘मायक्रोसॉफ्ट एक्सेल’च्या अॅपला एक किंवा दोन रेटींग देत त्याखाली ‘सर्फ एक्सेल’च्या जाहिरातीवरुन टीका केली आहे. यासंदर्भातील स्क्रीनशॉर्ट सध्या ट्विटवर व्हायलर होत आहेत.

‘मायक्रोसॉफ्ट एक्सेल’वरच भडकले

हो हे खरं आहे अनेकांना ‘सर्फ एक्सेल’ आणि ‘मायक्रोसॉफ्ट एक्सेल’ या दोन वेगळ्या कंपन्या असून त्यांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही हेच समजत नसल्याचे नेटकऱ्यांनी स्क्रीनशॉर्टसहीत पोस्ट करत म्हटले आहे. ‘सर्फ एक्सेल’ कपडे साफ करते तर ‘मायक्रोसॉफ्ट एक्सेल’ टायपिंगमधील चूका सुधारण्यास मदत करते एवढी साधी गोष्ट अनेकांना समजत नसल्याची टीका ट्विपल्सने केली आहे.

नक्की पाहा >> Video: या जाहिरातीमुळे ट्रेण्ड होतोय #BoycottSurfExcel हॅशटॅग

व्हायरल होत असलेल्या स्क्रीनशॉर्टपैकी एक स्क्रीनशॉर्ट खोटा असला तरी खरोखरच ‘मायक्रोसॉफ्ट एक्सेल’च्या गुगल प्लेवरील अॅपखाली काहीजणांनी ‘सर्फ एक्सेल’च्या जाहिरातीवरुन कमेन्ट केल्याचे दिसत आहे.

एका ब्रॅण्डची शिक्षा दुसऱ्या ब्रॅण्डला देण्याची भारतीयांची काही पहिली वेळ नाही. ‘स्नॅपचॅट’चे मुख्य कार्यकारी अधिकारी असणाऱ्या इव्हान स्पिगेल यांच्या वक्तव्याचा फटका ‘स्नॅपडील’ला बसला होता. या प्रकरणाची सुरुवात झाली ती ‘स्नॅपचॅट’चा माजी कर्मचारी अँथोनी पॉम्पलिनो याच्या एका पोस्टने. ‘कंपनीच्या विस्ताराबाबत एका बैठकीत स्पिगेल यांच्याकडे आपण विचारणा केली होती. त्यावर, भारत व स्पेनसारख्या गरीब देशांत विस्तार करण्याचा आपला मानस नाही, असे उत्तर स्पिगेल यांनी तेव्हा दिले होते’, असा दावा अँथोनी याने त्याच्या पोस्टमध्ये केला. त्यासरशी भारतीय नेटकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली. स्पिगेलविरोधात जळजळीत शब्दांतील टीका समाजमाध्यमांवर फिरू लागली. ट्विटरवर सर्वाधिक चर्चेच्या विषयांमध्ये हा विषय अलगद जाऊन बसला. त्याचसोबत अनेकांनी ‘स्नॅपचॅट’च्या नावाने बोटे मोडत ते अ‍ॅप आपल्या मोबाइलवरून काढून टाकले. त्याचे मानांकन कमी केले होते.