संकट कधी, केव्हा आणि कोणत्या रूपात चालून येईल हे सांगता येत नाही म्हणूनच पोलिसांना सदैव जागरूक राहावे लागते. पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेची प्रचिती आणून देणारी एक घटना ब्राझीलमध्ये घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ब्राझीलच्या पोलीस दलात असणारे राफेल सोऊझा हे आपली पत्नी आणि लहान मुलासह एका दुकानात खरेदीसाठी गेले. यावेळी दोन बंदुकधारी चोरटे दुकानात. त्यांनी बंदुकीचा धाक दाखवून दुकानातली रोकड लुटण्याचा त्यांनी प्रयत्न केला. राफेल यांनी त्याचवेळी तत्परता दाखवत आपली बंदुक काढली आणि चोरांवर गोळी झाडली. यावेळी त्यांचा छोटा मुलगा त्यांच्या जवळच होता. त्याला एका हाताने उचलून घेत दुसऱ्या हाताने त्यांनी चोरांवर गोळी झाडली. या चकमकीत दोन्ही चोरांचा खात्मा झाला. ब्राझीलमध्ये चोरी, लुटमार हे प्रकार रस्त्यावर सर्रास घडतात. अनेक चोरांकडे पिस्तुल असतंच त्यामुळे छोट्या मोठ्या कारणावरून गोळीबारीचे प्रकार इथल्या झोपडपट्ट्यात घडतात असंही एका वृत्तपत्रानं म्हटलं आहे. म्हणूनच इथले पोलीस हे नेहमीच दक्ष असतात.