भारत आणि अमेरिकेच्या संबंध मागील काही दिवसांपासून जास्तच मजबूत झाल्याचे चित्र दिसत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख प्रिय मित्र असा करत एक ट्विटही काही दिवसांपूर्वी केलं आहे. हायड्रॉक्सीक्लोरोक्विन या गोळ्यांचा पुरवठा भारताने अमेरिकाला करावा अशी मागणी ट्रम्प यांनी केली होती. याच पार्श्वभूमीवर भारत सरकारने या गोळ्यांवरील निर्यात बंदी उठवली आणि अमेरिकेला या गोळ्यांचा पुरवठा केला आहे. अमेरिकेमध्ये करोनाने थैमान घातलं असून करोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी हायड्रॉक्सीक्लोरोक्विन प्रभावी ठरत आहे. भारताने मदत केल्याने ट्रम्प भारतावर खूपच खूष असल्याचे चित्र दिसत आहे. मागच्या महिन्यातच ट्रम्प हे सहकुटुंब भारत दौऱ्यावर आले होते तेव्हाही मोदी आणि ट्रम्प यांच्यामधील मैत्रीचे दर्शन घडले होते. मात्र आता थेट ट्विटवरुनही भारत आणि अमेरिकेदरम्यानच्या मजबूत संबंधाचे चित्र पहायला मिळत आहे.

अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे कार्यालय आणि निवासस्थान असणाऱ्या व्हाइट हाऊसच्या ट्विटर हॅण्डलवरुन भारत आणि अमेरिकेतील संबंध सुदृढ होत असल्याचे चित्र दिसत आहे. व्हाइट हाऊसच्या ट्विटर अकाऊंटवरून जगभरातील केवळ १९ जणांना फॉलो केलं जातं. यामधील १६ अकाऊंट अमेरिकन व्यक्तींची अथवा संस्थांची आहे. तर उर्वरित तीन अकाऊंट ही भारतीय आहेत. व्हाइट हाऊसच्या ट्विटर हॅण्डलवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी (@narendramodi), पीएमओ इंडिया म्हणजेच भारतीय पंतप्रधान कार्यालयाचे ट्विटर अकाऊंट (@PMOIndia) आणि भारताचे राष्ट्रपतींच्या औपचारिक ट्विटर अकाऊंटला (@rashtrapatibhvn) फॉलो केलं जातं. याशिवाय भारताशी संबंधित आणखीन दोन अकाऊंट उर्वरित १६ जणांच्या यादीमध्ये आहे. ही अकाऊंट आहेत दिल्लीमध्ये असणारे भारतातील अमेरिकन राजदूतांचे अकाऊंट (@USAndIndia) आणि अमेरिकेची राजधानी असणाऱ्या वॉशिंग्टनमध्ये असणारे भारताच्या अमेरिकन राजदूतांचे अकाऊंट (@IndianEmbassyUS).

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, पंतप्रधान कार्यालय आणि भारताच्या राष्ट्रपतींच्या अकाऊंटला नुकतचं फॉलो करण्यात आल्याचं दिसत आहे. सध्या या गोष्टींची सोशल नेटवर्किंगवरही खूप चर्चा सुरु असल्याचे चित्र दिसून येत आहे.