कशाचाही दोष द्यायचा असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी गेल्याकाही दिवसांपासून पंडित जवाहरलाल नेहरू हे हक्काचं नाव झालं आहे. पण, याच नेहरू प्रेमाने सध्या भाजपाची कोंडी करून ठेवली आहे. राफेल व्यवहाराच्या फाईल गहाळ झाल्याच्या प्रकरणात या फाईल नेहरूंनीच चोरल्याचं सांगत सोशल मीडियावर मोदी आणि भाजपावर प्रचंड ट्रोलसुख घेतलं जात आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि इतर विरोधी पक्षातील नेत्यांनी राफेल करारात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केले आहेत. फ्रान्सकडून ३६ राफेल जेट विमाने खरेदी करण्याच्या करारात कोणताही गैरव्यवहार आढळलेला नसल्याचे डिसेंबर २०१८ मध्ये सुप्रीम कोर्टाने सांगतले होते. ऑफसेट हक्क रिलायन्स डिफेन्सला देण्याच्या निर्णयातही आक्षेपार्ह काहीच सापडले नसल्याचे यावेळी कोर्टाने स्पष्ट केले होते.

राफेल डीलमधील महत्त्वाची कागदपत्रं चोरीला गेल्याची माहिती समोर आल्यानंतर नेटीझन्सनी भाजपा ट्रोल केले आहे. भारतातील सर्व समस्येला जवाहरलाल नेहरू हेच कारणीभूत असल्याचे सांगणाऱ्या भाजपाला नेटीझन्सनी लक्ष्य केलं आहे. राफेल कराराराच्या फायली चोरीला जाण्यामागे माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आहेत का? असा सवाल नेटीझन्सनी भाजपाला केला आहे. सोशल मीडियावर यासंबंधीचे अनेक मिम्स व्हायरल होत आहे.

काहींनी तर याचा संबंध थेट मोदींच्या डिजिटल इंडियाशी जोडला. कागदपत्रांच्या डिजिटल कॉपी तयार केल्या असत्या, तर ही वेळ आली नसती, असं मत काहींनी व्यक्त केलं. नेहरुंचा हातात ब्रिफकेस घेतलेला फोटो काहींनी पोस्ट केला. त्या ब्रिफकेसमध्येच राफेल डिलची कागदपत्रं असतील असा दावा आता केला जाईल, असं ट्विट करत नेहरुंच्या फोटोसोबत ‘मेरा भूत सबसे मजबूत’ अशी ओळदेखील काहींनी लिहिली. पंतप्रधान मोदी स्वत:ला चौकीदार म्हणतात. मग कागदपत्रं कशी काय चोरीला कशी जातात? असा प्रश्नही नेटीझन्सनी उपस्थित केला आहे. काहींनी ‘मोदी है तो मुमकिन है’ या भाजपाची घोषणेची खिल्ली उडवली.

 पाकव्याप्त काश्मीरमधील एअर स्ट्राइकनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देश सुरक्षित हातात असल्याची भावना व्यक्त केली होती. या विधानाचाही सोशल मीडियानं चांगलाच समाचार घेतला आहे. कागदपत्रं सांभाळता येत नाही आणि म्हणे देश सुरक्षित हातात आहे, असा टोला अनेकांनी सरकारला लगावला.