भारतीय संघाने विश्वचषकातील साखळी सामन्यात गुरूवारी वेस्ट इंडिज संघाचा धावांनी 125 धावांनी धुव्वा उडवला. यासोबतच भारताने उपांत्य फेरीच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले. यंदाच्या वर्ल्ड कपमधील भारताचा हा सहा सामन्यांतील पाचवा विजय ठरला असून भारत हा एकमेव संघ अद्याप या स्पर्धेत अजिंक्य आहे. दरम्यान, विश्वचषकातील भारताच्या धडाकेबाज कामगिरीनंतर अनेक माजी दिग्गजांनी भारतच विजयाचा प्रबळ दावेदार असल्याचं मत व्यक्त केलं आहे. पाकिस्तान, श्रीलंकेकडून झालेला धक्कादायक पराभव आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियाने मात दिल्यापासून इंग्लंडच्या माजी खेळाडूंचे सूर सोशल मीडियावर देखील बदललेले पहायला मिळत आहेत.

आतापर्यंत इंग्लंडच विजयाचा प्रबळ दावेदार आहे, आणि घरच्या मैदानावर विश्वचषक असल्याने परिस्थितीचा फायदा उचलत इंग्लंड विश्वचषक जिंकेल अशा फुशारक्या मारणारे खुद्द इंग्लंडचेच माजी खेळाडू आणि कर्णधार देखील आता भारतीय संघ विश्वचषक जिंकू शकतो असं म्हणतायेत. इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन याने तर यापुढे जात एक विधान केलं आहे. भारत विश्वचषक जिंकू शकतो असं थेट म्हणणं वॉनने टाळलं मात्र, ‘जो संघ भारताला पराभूत करेल तोच संघ हा वर्ल्डकप जिंकेल’, असं ठाम विधान त्याने केलं आहे. गुरूवारच्या सामन्यात भारतीय संघ वेस्ट इंडिजचा धुव्वा उडवेल हे निश्चित झालं त्याचवेळेस मायकल वॉन याने भारतीय संघाला जो संघ पराभूत करेल तोच विश्वचषक जिंकेल, आणि या मताशी ठाम आहे असं विधान ट्विटरद्वारे केलं आहे. ट्विटरद्वारे सातत्याने मायकल वॉन भारतीय संघावर आणि संघातील खेळाडूंवर निशाणा साधत असतो किंवा टीका करत असतो, त्यामुळे त्याने केलेल्या या ट्विटनंतर सोशल मीडिया युजर्सकडून त्याची चांगलीच खिल्ली देखील उडवली जात आहे.


दरम्यान, मॅंचेस्टरमध्ये झालेल्या सामन्यात टीम इंडियानं विंडीजला विजयासाठी 269 धावांचं आव्हान दिलं होतं. विराट कोहलीनं 82 चेंडूत आठ चौकारांसह 72 धावांची जबाबदार खेळी साकारली. महेंद्रसिंग धोनीनं 61 चेंडूत नाबाद 56 धावांचं योगदान दिलं. धोनीच्या खेळीला तीन चौकार आणि दोन षटकारांचा साज होता. लोकेश राहुलनं 48 आणि हार्दिक पंड्यानं 46 धावांची खेळी उभारली. मात्र, विंडीजच्या फलंदाजांना टीम इंडियाने दिलेलं आव्हान पेलवलं नाही आणि त्यांचा डाव 35 व्या षटकात अवघ्या 143 धावांतच आटोपला. भारताकडून मोहम्मद शमीने पुन्हा एकदा शानदार कामगिरी करत केवळ 16 धावा मोजून चार फलंदाजांना माघारी धाडलं, त्याला जसप्रीत बुमराह आणि यजुवेंद्र चहलनं प्रत्येकी दोन विकेट्स काढून चांगली साथ दिली. कर्णधार विराट कोहलीला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.