ग्रेटा थनबर्ग हे नाव सध्या जगभरात सर्वात जास्त चर्चेत आहे. या १६ वर्षीय मुलीला शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी नामांकन देण्यात आले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे जगातील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कारांपैकी एक असलेल्या नोबेल पुरस्काराचे नामांकन ग्रेटाला अवघ्या १६ व्या वर्षी मिळाले. परंतु संपूर्ण आयुष्य अहिंसा आणि शांती या तत्वांसाठी वाहून घेणाऱ्या महात्मा गांधी यांच्या नावाचीही पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली होती. पण, प्रत्येक वेळी शुल्लक कारणांमुळे त्यांना नोबेल मिळू शकलं नाही.

१९३७, १९३८, १९३९, १९४७ आणि शेवटी १९४८ या पाच वेळा शांततेसाठी दिल्या जाणाऱ्या नोबेल पुरस्कारासाठी महात्मा गांधीजी यांना नामांकन मिळाले होते. महात्मा गांधी हे २०व्या शतकात भारतासह संपूर्ण जगभरात अहिंसा, शांती आणि सत्याचा प्रसार करणारी व्यक्ती म्हणून ओळखले जात. १९३७ साली गांधींच्या योगदानावर प्रो. वॉप्स मूलर यांना एक अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले होते. परंतु मूलर गांधींच्या विचारांच्या परस्पर विरुद्ध विचारांचे होते. त्यांनी गांधींचे विचार भारताला लागू पडत असतील, परंतु पाश्चात्य संस्कृतीत या विचारांना फारसे महत्व नाही. अशा आशयाचा अहवाल सादर केल्यामुळे गांधींना त्या वर्षीचा नोबेल मिळाला नाही.

त्यानंतर १९३८ आणि १९३७ साली देखील अशाच प्रकारची कारणे नोबेल समितीने दिली होती. महात्मा गांधींचे आंदोलन अहिंसक आहे, मात्र कधीही ते हिंसक मार्गाने पेटू शकते अशा प्रकारची कारणे दिल्यामुळे महात्मा गांधींचे नाव नोबेल पुरस्कारासाठी नाकारण्यात आले. त्यानंतर १९४७ साली चौथ्यांदा महात्मा गांधींना नोबेलसाठी नामांकन मिळाले होते. परंतु नोबेल समितीच्या पाच पैकी तीन सदस्यांनी महात्मा गांधींविरोधात मतदान केले. या विरोधी मतदान करण्यामागे भारत-पाकिस्तान फाळणीचे कारण देण्यात आले. १९४७ सालचे नोबेल ‘क्वेकर्स’ यांना मिळाले होते.

१९४८ साली पाचव्यांदा महात्मा गांधींना नोबेलसाठी नामांकन मिळाले. परंतु त्याआधी कधीही मरणोत्तर पुरस्कार प्रदान करण्यात आलेले नव्हते. नोबेल समिती पहिल्यांदा या निष्कर्षाला येऊन पोहोचली की महात्मा गांधीजी यांना मरणोत्तर पुरस्कार प्रदान करावा. परंतु, बक्षीस देणाऱ्या स्विडिश फाउंडेशनला काही कारणास्तव हे मान्य नव्हते. त्यामुळे गांधींना पुरस्कार नाकारण्यात आला. त्यावेळी महात्मा गांधी यांना नोबेल पुरस्कार न देण्यावरून नोबेल फाउंडेशनच्या अनेक सदस्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. तसेच १९८९ साली दलाई लामा यांना शांतीचे नोबेल देण्यात आले होते. तेव्हा नोबेल कमिटीच्या अध्यक्षांनी ते महात्मा गांधी यांना समर्पित केले होते.