आजच्या घडीला असं एकही क्षेत्र नाही जेथे महिलांचा वावर नाही. प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांनी नाव मिळवलं आहे. रेल्वे असो किंवा सिमेवर परकीय शत्रूंबरोबर दोन हात करण्याची वेळ असो. प्रत्येक क्षेत्रामध्ये आजची महिला आघाडीवर असते. त्यातलंच जीवंत उदाहरण द्यायचं झालं तर भारतीय हवाई दलाची महिला वैमानिक अवनी चतुर्वेदी ही आहे. कमी वयामध्ये एकटीने लढाऊ विमान उडविण्याचा विक्रम अवनीने केला आहे. त्यामुळेच पावला-पावलावर स्वत:ला सिद्ध करणाऱ्या या महिलांची यशोगाथा लवकरच उलगडली जाणार आहे.

महिलांनी कितीही प्रगती करण्याचा विचार केला तरी त्यांच्या मार्गामध्ये अनेक अडथळे येत असतात. अनेक वेळा त्यांच्यावर विनोदनिर्मितीही करण्यात येते. मात्र यासाऱ्याकडे दुर्लक्ष करत महिला त्यांच्यातील चुणूक दाखवत असतात. यामुळेच महिलांमधील हे साहस आणि त्यांचं कर्तृत्व जगासमोर यावं यासाठी लवकरच ‘वुमन फायटर पायलट्स’ हा नवा शो येणार आहे.

आतापर्यंत महिलांनी केवळ प्रवासी विमान किंवा हेलीकॉप्टरच उडविले होते. मात्र अवनीने हा समज खोडून काढत लढाऊ विमान उडवून दाखविलं. त्यामुळे आता महिला केवळ प्रवासी विमान नाही तर लढाऊ विमानदेखील उडवू शकतात हे तिने सिद्ध करुन दाखविलं आहे. यासाठीच लढाऊ विमान उडविणाऱ्या भारतीय महिला वैमानिकांवर डिस्कवरी या वाहिनीवर ‘वुमन फायटर पायलट्स’ हा शो सुरु करण्यात येणार आहे. हा शो दोन भागांमध्ये प्रदर्शित होणार असून यात अवनी चतुर्वेदी, भावना कांत आणि मोहना सिंह या महिलांची यशोगाथा दाखविण्यात येणार आहे.

दरम्यान, मला आयुष्यात जे काम करायचं होते.तेच काम मी काम करत आहे. लढाऊ वैमानिक होऊन देशसेवा करणं हेच माझं कर्तव्य आहे आणि जर माझ्या कार्यामुळे देशातील लोक प्रेरणा घेत असतील तर ही चांगली गोष्ट आहे, असं भावना कांत म्हणाली.