करोना महामारीनंतर अनेकांचं आयुष्य बदललं. शाळा, कॉलेज, ऑफिस सर्वकाही चार भिंतींच्या आत शिफ्ट झाले. अशात वर्क फ्रॉम होम हा नवीन ट्रेंड सुरू झाला आणि लोकांना घरुनच काम करण्यात मजा यायला लागली. गेल्या वर्षभरापासून लाखो सरकारी आणि खासगी कर्मचारी घरुन काम करतायेत. वर्क फ्रॉम होम ही संकल्पना अनेकांना चांगलीच आवडली आहे.

अशात अलिकडेच करोना व्हॅक्सिन उपलब्ध झाल्यापासून करोना रुग्णांच्या संख्येत थोडीफार घट झाली, त्यामुळे अनेक कार्यालय न्यू नॉर्मल नियमांतर्गत पुन्हा सुरू होत आहेत. त्यामुळे घरुन काम करण्याची मजा घेणारे कर्मचारी ‘सुख भरे दिन बीते रे भइया अब दुख आयो रे… अशा आशयाचं गाणं गात आपलं दुःख सांगण्याचा प्रयत्न करतायेत.  असाच एका महिला कर्मचारीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. हा व्हिडिओ बघितल्यावर तुम्हाला हसू आवरणार नाही हे नक्की.

“माझ्यासोबत अत्यंत हृदय विदारक घटना घडली आहे. तीन दिवसांपूर्वी पुन्हा ऑफिस सुरू होत असल्याचा मला इमेल आला…याला काय अर्थ आहे…म्हणजे आता चादर हटवून आंघोळ करुन ऑफिस जावं लागणार आणि पुन्हा लोकांची तोंडं बघावी लागणार…अजून तर त्यांनी मला ऑफिसला बोलावलं नाहीये, आता फक्त विचारलंय की ऑफिसला येण्याबाबत काय विचार आहे, तरी माझ्या अंगावर काटा येतोय… मला यांना विचारायचं की कशासाठी पुन्हा सुरू करायचंय ऑफिस, तुमचे पैसे वाचतायेत..कर्मचाऱ्यांवर होणारा खर्च वाचतोय…गरिबाच्या पोटावर कशाला लाथ मारतायेत…आता कुठे माझा चेहरा पुन्हा उजळायला लागला, सर्व डार्क सर्कल्स गेले आणि आता तुम्ही असं करतायेत…मला तर खूप घाबरायला होतंय. मी माझे सर्व कपडे पॅक केलेत, पायजमा घालून जगण्याची सवय झाली आहे… सिंहाच्या तोंडाला आता रक्त लागलंय… त्यामुळे आता ‘हमसे ना हो पायेगा’… कुत्र्याला हड्डी देऊन परत घ्याल तर तो भूंकणारच ना…”असं ही तरुणी बोलताना दिसतेय. इतकं सगळं बोलून झाल्यानंतर मात्र ही तरुणी आपल्या बॉसचं नाव घेऊन “मी फक्त मजेसाठी हा व्हिडिओ बनवलाय, आधीच मार्केटमध्ये नोकऱ्या शिल्लक नाहीयेत, कृपया मला कामावरुन काढू नका सांगाल तिथे येऊन काम करायला मी तयार आहे” असं म्हणते. तिचा हा व्हिडिओ बघून वर्क फ्रॉम होम करणारे कर्मचारी आमच्या भावना बोलून दाखवल्यास अशाप्रकारच्या एकाहून एक मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत.


गेल्या आठवड्यापासून हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय