धोकादायक स्थितीत सेल्फी घेताना जीव गमावल्याची आणखी एक घटना घडली आहे. सँड्रा मनुला डा कॉस्टा मकेडो असं या 27 वर्षांच्या तरूणीचं नाव आहे. इमारतीतल्या 27व्या मजल्यावर गॅलरीमध्ये कठड्याला टेकून ती सेल्फी घेत होती. यावेळी ती तोल जाऊन खाली पडली आणि मरण पावली. डेली मेलनं या संदर्भात वृत्त दिलं असून इमारतीच्या खाली उभ्या असलेल्या काहिंनी याचं शुटिंग केल्याचं व फोटोही काढल्याचं समोर आलं आहे.

सहज म्हणून शुटिंग करताना एका व्यक्तिच्या लक्षात आलं की हे काहीतरी भयंकर घडतंय. तो जोरात ओरडला, अरे ती वेडी झालीय, तिच्याकडे बघा, ती पडेल आणि असं म्हणताना ती खरंच खाली पडली. हे सगळं दृष्य काही जणांच्या कॅमेऱ्यात कैद झालं व युट्यूबवर अपलोडही करण्यात आलंय.

पनामा सिटीमध्ये हा भयानक प्रसंग घडला. लक्झर टॉवरमधल्या 27 व्या मजल्यावरून ही तरूणी खाली पडल्यानंतर काही वेळातच वैद्यकीय मदत पथक घटनास्थळी पोचलं पण त्यांचा काही उपयोग झाला नाही. कारण ही तरूणी जागीच गतप्राण झाली होती. सँड्रा ही पोर्तुगीज असून पनामा सिटीत ती कामासाठी आली होती. तिच्या मैत्रिणीनं नंतर सोशल मीडियावर तिच्याबद्दल माहिती दिली व ती दोन मुलांची आई असल्याचं सांगितलं. नुकतीच तिला पनामामध्ये शिक्षिकेची नोकरी मिळाली होती. या प्रकरणाची चौकशी पौलिसांकडून करण्यात येत आहे. प्राथमिक माहितीनुसार सेल्फी घेताना सोसाट्याच्या वाऱ्यामुळे तिचा तोल गेला असावा आणि ती खाली पडली असावी असा अंदाज आहे. मात्र, या निमित्तानं सेल्फीचं वेड जगभरात कसं धोकादायक सिद्ध होतंय हे दिसत आहे.