काही महिन्यांपूर्वी डॉक्टर अमांडा हेस हिचा फोटो सोशल मीडियावर खूपच गाजला होता. प्रसूतीसाठी ती रुग्णालयात आली होती. तिच्या शेजारी असलेल्या महिलेला प्रसूतीकळा सुरू झाल्या, डॉक्टर यायला अवधी होता. तेव्हा अमांडा हेस हिनं स्वत:च्या प्रसूतीची काळजी न करता या महिलेची प्रसूती केली आणि नंतर काही मिनिटांतच स्वत:च्या बाळाला जन्म दिला. त्यावेळी अमांडा ही सोशल मीडियावर सगळ्यांची प्रेरणास्थान ठरली होती. आता आणखी एक महिला सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

नाझिया थॉमस असं या महिलेचं नाव असून ती अमेरिकेतल्या एका कॉलेजमध्ये मानसशास्त्र हा विषय शिकत आहे. प्रसूतीची तारीख आणि परीक्षा एकत्र आल्यानं तिची मोठी पंचाईत झाली. पण, काही झालं तरी आपली परीक्षा अर्धवट राहता कामा नये हा विचार तिच्या मनाशी पक्का होता. म्हणूनच प्रसूत होण्याआधी तिनं आपली परीक्षा दिली. रुग्णालयच्या बेडवर लॅपटॉप घेऊन परीक्षा देत असलेल्या नाझियाचा फोटो तिच्या आईनं टिपला. विशेष म्हणजे परीक्षा देऊन झाल्यानंतर काही अवधितच ती प्रसूत झाली. तिला मुलगा झाला आणि परीक्षाही ती चांगल्या गुणाने उत्तीर्ण झाली.