आयपीएस अधिकारी सचिन अतुलकर यांची एक झलक पाहण्यासाठी पंजाबमधली २७ वर्षीय तरुणी चक्क उज्जैनला पळून आली. तीन दिवसांपूर्वी ती पंजाबमधून मध्यप्रदेशमध्ये आली आहे. जोपर्यंत सचिन अतुलकर यांची प्रत्यक्षात भेट होत नाही तोपर्यंत घरी जाणार नाही असा हट्ट तिनं धरला आहे.

सचिन अतुलकर यांची सोशल मीडियावर फॅन फॉलोविंग मोठी आहे. अनेकांनी तर या आयपीएस अधिकाऱ्याची तुलना बॉलिवूडमधल्या कलाकारांशी केली आहे. त्यामुळे काही महिन्यांपासून सचिन यांची चर्चा सोशल मीडियावर पाहायला मिळाली होती. त्याचे सोशल मीडियावरचे फोटो पाहून ही तरुणी मध्य प्रदेशमध्ये आली आहे. सचिन यांची सध्या उज्जैन पोलीस अधिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. इंडिया टुडेच्या माहितीनुसार ही तरुणी मानसशास्त्राची विद्यार्थीनी आहे. चुकून दुसरी ट्रेन पकडली आणि आपण मध्य प्रदेशमध्ये आलो असं तिनं पोलिसांना सांगितलं. मात्र जोपर्यंत सचिन अतुलकर यांची भेट होत नाही तोपर्यंत घरी जाण्यास तिनं साफ नकार दिला आहे.

एकदा अतुलकर यांना भेटायचं आहे अशी वारंवार विनंती ती पोलिसांना करत आहे. पोलिसांनी तिच्या कुटुंबियांनाही बोलावून घेतलं आहे. समुपदेशन करुन तिला परत पाठवण्यात येणार असल्याचंही संबंधित संकेतस्थाळानं म्हटलं आहे. या मुलीची खरंच अडचण असेल तर तिला भेटायला मी तयार आहे मात्र वैयक्तिक कारणासाठी तिला भेटण्याचा आग्रह करू नका असं अतुलकर यांनी स्पष्ट केलं आहे.