जगभरात पसरलेल्या करोना विषाणूने अवघ्या काही महिन्यांमध्ये सगळी समीकरणंच बदलून टाकली. घड्याळाच्या काट्यावर धावणारं जग अचानक ठप्प झालं. भारतामध्येही परिस्थितीचा सामना करण्यासाठी लॉकडाउनची घोषणा करण्यात आली. मात्र देशातील कामगार, मजूर यांना या परिस्थितीचा चांगलाच फटका बसला. मात्र अशा परिस्थितीतही भारतीय लोकं आपली जात-पात, धर्म-पंथ या सर्व गोष्टी विसरुन अडचणीत सापडलेल्या व्यक्तींची मदत करण्यासाठी पुढे येत आहेत. कर्नाटकातील मैसूर शहरात राहणाऱ्या कमलअम्मा या ७० वर्षीय आजींनी आपल्या मनाचा मोठेपणा दाखवत, ६०० रुपयांच्या पेन्शनमधून ५०० रुपये हे परप्रांतीय मजुरांसाठी जेवण बनवणाऱ्या सेवाभावी कार्यकर्त्यांना दिले. गेले काही दिवस सोशल मीडियावर या आजीबाईंची कहाणी चांगलीच व्हायरल झाली होती.

७० वर्षीय कमलअम्मा आपल्या पतीच्या निधनानंतर घरकामं करतात. मात्र लॉकडाउन काळात कमलअम्मांचं वय पाहता, त्यांनी काम करु नये यासाठी घरमालकांनी त्यांना कामावर येऊ नका असं सांगितलं. कमलअम्मा यांना दोन मुलं असली तरीही या काळात त्या कोणावरही अवलंबून नाहीत, सरकारकडून मिळणाऱ्या ६०० रुपयांच्या पेन्शनमध्ये त्या आपलं दैनंदीन जिवन जगत होत्या. काही दिवसांपूर्वी मैसूर भागातील रोटरी क्लबच्या अधिकाऱ्यांनी आपल्या अन्नदान मोहिमेच्या माध्यमातून कमलअम्मांना मदत केली. यावेळी अम्मांनी अन्नदानासाठी मदत करण्याची इच्छा व्यक्त करत, आपल्या पेन्शनमधील ५०० रुपये दान दिले.

अवश्य वाचा – …अडचणीत असाल तर मोफत न्या ! मनाची श्रीमंती दाखवणाऱ्या मराठमोळ्या भाजीवाल्याची गोष्ट

कमलअम्मा यांनी केलेली मदत जरी छोटी असली, तरीही सध्याच्या काळात त्यांनी दाखवलेलं सामाजिक भान हे नक्कीच वाखणण्याजोगं आहे. सध्याच्या खडतर काळात अडचणीत सापडलेल्या कामगारांना आपलं राहतं घर सोडून पायी चालत जाण्याची वेळ आल्याच्या अनेक बातम्या आपण पाहिल्या. त्यामुळे अशाही परिस्थितीत कमलअम्मांसारख्या व्यक्तींमुळे समाजातील एकता टिकून असल्याचं स्पष्ट होतं.