चीनमधील एका ४५ वर्षीय महिलेने विमानांची तिकीटं बूक करुन ती रद्द करत विमा कंपन्यांना चक्क तीन कोटी २० लाखांचा चुना लावल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या माहिलेने २०१५ ते २०१९ या कालावधीमध्ये हा घोटाळा केल्याचे उघड झालं आहे. ही महिला ज्या विमानांचे उड्डाण उशीरा होणार आहे अशा विमानांची तिकीटं काढून त्या माध्यमांतून विम्याचा दावा करुन पैसे कमावायची. यासंदर्भातील वृत्त ‘द पेपर’ने दिलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेल्या महिलेचे अडनाव ली असं आहे. या महिलेने २०१५ ते २०१९ या कालावधीमध्ये शेकडो विमान तिकीटं काढली. मात्र या महिलेला खरं तर कुठेच प्रवास करायचा नव्हता. तिकीटं काढतानाच ही महिला जी विमानं उशीराने उड्डाण करण्याची शक्यता आहे अशा विमानांची तिकीटं काढायची. त्यामुळे या महिलेला डिले इन्सॉरन्स म्हणजेच उशीराने उड्डाण केल्याबद्दल विमा कंपन्यांकडून मिळणारी रक्कम मिळायची. या महिलेने जवळजवळ २० हून अधिक नावांनी तिकीटं बूक करुन त्यामाध्यमातून ९०० हून अधिक वेळा विम्याची रक्कमेसाठी अर्ज करुन या माध्यमातून तीन कोटींहून अधिक रक्कम कमवली. अनेकदा ही महिला स्वत:बरोबरच तिच्या कुटुंबियांच्या आणि मित्र मैत्रिणींच्या नावाने तिकीटं बूक करायची.

या महिलेने विमानाने कधीच प्रवास केला नाही. मात्र हवाई क्षेत्रामध्ये काम केल्याने कोणती विमानं कशापद्धतीने उशीरा उड्डाण करतात याबद्दल तिला चांगलीच माहिती होती. त्यामुळे ती उशीराने उड्डाण होण्याची शक्यता असणाऱ्या विमानांचीच तिकटं काढायची आणि विम्यासाठी अर्ज करायची. तपास यंत्रणांपासून वाचण्यासाठी या महिलेने ३० हून अधिक नावांनी विमा पॉलिसी काढल्या होत्या. प्रत्येक नावावर तिने ४० पर्यंत विमा पॉलिसी काढल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे विमान तिकीटं काढल्यानंतर विमानाने उशीरा उड्डाण केल्यावर ती आलटून पालटून वेगवगेळ्या कंपन्यांकडून विम्याची रक्कम मिळवायची.

शुक्रवारी अधिकाऱ्यांनी या महिलेला रंगेहाथ पकडलं. या महिलेल्या अटक करण्यात आली असून तिच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर विम्या संबंधित घोटाळे आणि चीनमधील प्रवास विमा याबद्दल अधिक सक्षम नियम बनवण्यात यावेत यासंदर्भातील चर्चांना पुन्हा सुरुवात झाली आहे. विमा पॉलिसींमध्ये बदल करुन विमान उशीरा उड्डाण करत असल्यास कोणत्या अटींखाली विम्याची रक्कम दिली जावे यासंदर्भात फेरविचार करण्याची आणि नियम कठोर करण्याची गरज असल्याचे काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.