सध्या एक महिला अधिकारी फारच चर्चेत आहेत. त्यांच्या उत्तम कामासाठी नाही तर अन्य एका गोष्टीमुळे त्या चर्चेत आल्या आहे. राजस्थानमधील उदयपुरमध्ये आदिवासी विभागात आर्थिक सल्लागार पदी या महिला अधिकारी कार्यरत आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांच्या घरी आणि कार्यालयावर लाचलुचपत विभागाने छापे टाकले आणि त्यानंतर सर्वांचेच डोळे पांढरे पडले.

लाचलुचपत विभागाने निरनिराळ्या सात ठिकाणी भारती राज यांच्या घरावर आणि कार्यालयावर छापे टाकले. यामध्ये त्यांच्या चार बँक खात्यात 1.03 कोटी रूपये, एक 500 चौरस मीटरचा प्लॉट, तीन मजली हॉटेल, तसेच एका मोठ्या परिसरात दोन मोठी शोरूम असल्याची माहिती समोर आली. याव्यतिरिक्त तीन सरकारी बँकांमध्ये चार लॉकरही असल्याचे या छाप्यातून समोर आले आहे. याव्यतिरिक्त लाचलुचपत विभागाने त्यांच्या वडिलांच्या घराचीही झडती घेतली. त्यादरम्यान, 92 लाखांची एफडी, दोन दुकाने, दोन प्लॉट, 8 बँक खाती, उत्तर प्रदेशात जमीन असल्याची माहितीही सर्वाच्या समोर आली. तसेच त्यांच्या वडिलांकडून 50 लाख रूपयांच्या परदेशी गुंतवणुकीची कागदपत्रे आणि 250 डॉलर्स, तसेच 50 युरोही जप्त करण्यात आले.

तपासादरम्यान, भारती यांनी गेल्या 10 वर्षांमध्ये 21 देशांचे दौरे केल्याची माहिती समोर आले आहे. यामध्ये स्वित्झर्लंड, जपान, इटली, फ्रान्स, न्यूझीलंडसारख्या देशांचा समावेश असून त्यांनी यादरम्यान 20 लाखांपर्यंतचा खर्च केला असल्याची कागपत्रेही सापडली आहेत. तर त्यांच्या एका बँकेतील लॉकरमध्ये 30 लाख रूपयांची सोन्याचे आणि हिऱ्याचे दागिनेही सापडले असल्याची माहिती लाचलुचपत विभागाचे महासंचालक अलोक त्रिपाठी यांनी दिली.