वेगवेगळ्या निमंत्रण पत्रकामुळे किंवा इतर कारणामुळे अनेक विवाहसोहळे सोशल मीडियावर चर्चेत येतात. पण सध्या सोशल मीडियावर एक बंगाली लग्न वेगळ्याच कारणामुळे चर्चेचा विषय ठरत आहे. मुलीच्या वडिलांनी कन्यादान करण्यास नकार दिल्यामुळे हा विवाहसोहळा सध्या चर्चेचा विषय आहे. ‘मुलगी म्हणजे संपत्ती नाही जी मी दान करेल,’ असे म्हणत मुलीच्या वडिलांनी कन्यादान करण्यास नकार दिला आहे. मुलीच्या वडिलांनी घेतलेल्या या निर्णायाचे सोशल मीडियावर कौतुक केले जात आहे. या कुटुंबाने पारंपारिक पद्धत सोडत विवाहातील विधींसाठी महिला पुजाराला बोलवलं होतं. नेटीझन्सनी त्यांच्यावर कौतुकांचा वर्षाव केला आहे.

अस्मिता घोष या महिलेने ट्विटरवर या लग्नातील फोटो पोस्ट करत. लग्नाच्या वेळी घडलेली घटना सांगितली आहे. पोस्ट वाचून प्रत्येक नेटीझन्सच्या मनात ‘मेरा देश बदल रहा है’ येत असेल. ‘मी एका विवाहाला आले आहे. विवाहाच्या विधीसाठी महिला पुजाऱ्याला बोलण्यात आले आहे. त्याशिवाय लग्नसमारंभात नवरीमुलीचा परिचय करून देताना आईचे नाव प्रथम आणि नंतर वडिलांचे नाव घेण्यात आले. विवाहसोहळ्यात मुलीचे वडिलांनी कन्यादान करणार नाहीत. कारण, मुलगी काही संपत्ती नाही असे वडिलांचे मत आहे.’ अशी पोस्ट अस्मिता घोष या महिलेने लिहिली आहे.