नवऱ्याकडून होणारी मारहाण , सासू-सासऱ्यांकडून छळ , हुंड्याची मागणी अशा विविध कारणांमुळे पत्नीने घटस्फोटाची मागणी केल्याचं आपण नेहमीच ऐकत असतो. पण, नवरा खूप जास्त प्रेम करतो म्हणून एखाद्या पत्नीने घटस्फोटाची मागणी केल्याचं तुम्ही कधी ऐकलंय का. विश्वास बसत नसला तरी अशीच एक घटना समोर आली आहे.

संयुक्त अरब अमिरातच्या एका महिलेने येथील शरिया कोर्टात अशीच याचिका दाखल केली आहे. पती खूप जास्त प्रेम करतो आणि त्यामुळे मी कंटाळलीये परिणामी मला घटस्फोट हवाय अशी याचिका या महिलेने फुजैरा येथील शरिया कोर्टात केली आहे. ‘खलिज टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, अवघ्या वर्षभरापूर्वी दोघांचं लग्न झालंय.

‘पती कधीच माझ्यावर ओरडत नाही, किंवा एखाद्या गोष्टीमुळे मला चीड यावी अशी काहीच घटना तो होऊ देत नाही…मी नाराज व्हावी असं तो वागत नाही….इतकंच काय तर घरातील साफसफाई असो किंवा जेवण बनवण्यातही तो माझी मदत करतो, कधीकधी तर तोच ही कामं करतो. लग्नाला एक वर्ष होऊन गेलं तरी अद्याप आमच्यात एकदाही भांडण झालेलं नाही. पतीच्या इतक्या प्रेमाचा आता मला कंटाळा आलाय. गेल्या कित्येक दिवसांपासून मी भांडण करण्याचा प्रयत्न करतेय पण माझा रोमॅंटिक पती भांडणाची कोणती संधीच देत नाही. भांडणासाठी मुद्दाम मी चुकीचा मार्गही वापरला पण तो दरवेळेस मला माफ करतो’, अशा आशयाची याचिका या महिलेने कोर्टात केली आहे. ‘एखाद्या मुद्यावर तरी त्याच्याशी मतभेद व्हावेत आणि वादविवाद व्हावा किंवा किमान चर्चा तरी व्हावी , जेणेकरुन माझं लग्न झालंय असं मला वाटेल अशी माझी इच्छा आहे’, असंही या महिलेने म्हटलं आहे.

तर, मी केवळ एक आदर्श आणि उत्तम पती बनण्याचा प्रयत्न करत होतो असं तिच्या पतीने म्हटलं आहे. पतीने कोर्टाकडे पत्नीची याचिका फेटाळून देण्याचीही मागणी केली आहे. केवळ एकाच वर्षात एखाद्याच्या लग्नाबाबत निर्णय देणं योग्य नाहीये असं पतीने कोर्टात म्हटलं. दरम्यान, कोर्टाने दोघांनाही समेट घडवण्याचा सल्ला दिला आहे.